Menu Close

जयंती : हिंदूंनी शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटिबद्ध व्हावे

हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने हिंदूंमधील स्फुल्लिगं जागवले !

मुंबई : ज्यांच्यामुळे देवळांतील देव शिल्लक राहिले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रतिवर्षी राज्यभर उत्साहात साजरी केली जाते. त्यानिमित्ताने हिंदूंमध्ये एक दिवसापुरते शिवतेज जागृत झालेले असते; मात्र दुसर्‍या दिवसापासून हिंदु ‘धर्मनिरपेक्ष’ होतो. स्वातंत्र्यानंतर आपल्यावर धर्मनिरपेक्षतेचे मोठ्या प्रमाणात संस्कार केले गेले. काही महाभागांनी शिवाजी महाराजांवरही धर्मनिरपेक्षतेचे ‘लेबल’ चिकटवले. त्यामुळे खरे शिवाजी आपल्याला कळलेच नाहीत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ५ पातशाह्यांना लोळवून शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. धर्मसंस्थापनेच्या मार्गात येणार्‍यांना त्यांनी समूळ नष्ट केलेे. आजची परिस्थितीही त्याहून वेगळी नाही. हिंदूंमधील धर्मतेज लोप पावू लागल्यामुळे धर्मावर सर्वच स्तरांवर आघात होत आहेत. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा आदर्श घेऊन या आघातांच्या विरोधात लढण्यास सिद्ध होणे आज काळाची आवश्यकता आहे. शिवरायांचा पराक्रमी इतिहास केवळ वाचण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी नसून तो आचरणात आणण्यासाठी आहे. शिवचरित्रातील प्रत्येक प्रसंग हिंदूंना त्यांच्यातील स्फुल्लिगं चेतवण्याचीच प्रेरणा देतो. त्यासाठी हिंदूंनी शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटिबद्ध व्हावे,’ असे आवाहन करून हिंदू जनजागृती समितीच्या वक्त्यांनी हिंदूंमधील स्फुल्लिगं जागवले.

शिवजयंतीच्या निमित्ताने मुंबईतील ७ मंडळांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्यांना ‘शिवजयंती आणि शिवचरित्र’ या विषयांवर व्याख्यान घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. समितीच्या वक्त्यांनी अत्यंत प्रभावीपणे विषय मांडून उपस्थितांना राष्ट्र आणि धर्मजागृतीचे कार्य करण्यास प्रेरित केले.

घाटकोपर पश्‍चिम

भेट दिलेली तलवार उंचावतांना श्री. सतीश कोचरेकर

१. येथे रणरागिणी शाखेच्या सौ. नयना भगत यांनी व्याख्यान घेतले. रस्त्यावरून जाणार्‍या अनेकांनी थांबून व्याख्यानाचा लाभ घेतला. दुचाकीवरून जाणार्‍या दोन जिज्ञासूंच्या कानावर विषय पडताच त्यांनी दुचाकी बाजूला लावून संपूर्ण व्याख्यान ऐकले. ग्रंथ विकत घेऊन संकेतस्थळाच्या माध्यमातून धर्मजागृतीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. १५० स्थानिक शिवप्रेमींनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. या वेळी सभामंडपात क्रांतीकारकांच्या शौर्यगाथेचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.

२. येथील ॐ साईराम मित्र मंडळाने आयोजित व्याख्यानात समितीचे श्री. सतीश कोचरेकर यांनी शौर्यजागरणाचे आणि धर्मशिक्षणाचे महत्त्व विशद केले. व्याख्यानाच्या कालावधीत उपस्थितांकडून उत्स्फूर्तपणे घोषणा देण्यात आल्या. व्याख्यानाच्या शेवटी मंडळाच्या वतीने श्री. कोचरेकर यांना शौर्याचे प्रतीक असलेली तलवार भेट देण्यात आली. त्या वेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. परिसरातील ८० शिवप्रेमींनी व्याख्यानाचा लाभ घेतला. यावेळी समितीच्या वतीने क्रांतिकारकांच्या पराक्रमांचे सचित्र फ्लेक्स प्रदर्शनही लावण्यात आले होते.

नेरूळ

येथील सेक्टर २४ मधील शिवप्रेमी मंडळाने यंदा पहिल्याच वर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले होते. त्यानिमित्ताने विनामूल्य आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे मुंबई जिल्हा प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी व्याख्यानातून उपस्थितांना हिंदु राष्ट्र स्थापनेचे महत्त्व पटवून दिले. या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थिनी कु. कोमल झेंडे हिने शिवचरित्रातील स्वगत आवेशपूर्ण स्वरात म्हटले. ७० शिवप्रेमींनी व्याख्यानाचा लाभ घेतला.

भांडुप पश्‍चिम

येथील महाराष्ट्र नगरमध्ये झालेल्या व्याख्यानामध्ये बोलतांना समितीचे श्री. प्रसाद वडके म्हणाले, ‘‘आज शिवाजी महाराज जन्माला यावेत’, असे वाटत असेल, तर आधी स्त्रियांनी राजमाता जिजाऊ आणि तरुण यांनी मावळे बनायला हवे. तरुणांपुढील खानांचा आदर्श जाऊन शिवाजी महाराजांसारख्या पराक्रमी वीरांचा आदर्श निर्माण व्हायला हवा. ४५ स्थानिक शिवप्रेमींनी व्याख्यानाचा लाभ घेतला.

अंधेरी

येथील शंकरवाडीमधील आेंकारेश्‍वर मंदिर ट्रस्ट आणि शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवातील व्याख्यानात समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी सध्याच्या शालेय अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकांतून छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा चुकीचा इतिहास शिकवला जातो, याविषयी उपस्थितांचे प्रबोधन केले. स्थानिक ४५ शिवप्रेमींनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. येथील स्थानिक शिवसैनिक श्री. गणेश घाडगे यांनी पुढाकार घेऊन व्याख्यानाचे आयोजन केले. शिवसेनेचे उपशाखाप्रमुख श्रीरंग(बाबा) सावंत या वेळी उपस्थित होते.

कुर्ला (पश्‍चिम)

येथील कमानी भागातील संतोषी माता मंदिरात झालेल्या व्याख्यानात समितीचे श्री. योगेश शिर्के यांनी सार्वजनिक उत्सवांमध्ये केवळ मनोरंजनात्मक खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्याऐवजी तरुणांमध्ये वीरश्री निर्माण करणार्‍या स्पर्धा भरवण्याचे महत्त्व समजावून सांगितले. ३० शिवप्रेमींनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.

चेंबूर

घाटला गाव, चेंबुर येथील व्याख्यानात विषय मांडतांना श्री. नरेंद्र सुर्वे

येथील घाटला गावातील शिवनेरी मित्रमंडळात आयोजित केलेल्या व्याख्यानात समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे म्हणाले की, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री जगदंबेचे अखंड नामस्मरण करत दुर्जनांविरुद्ध लढा दिला, त्याप्रमाणे आपणही आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करत राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले पाहिजे. ५० शिवप्रेमींनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.

क्षणचित्रे

१. चेंबूर येथील व्याख्यानाला उपस्थित सर्व हिंदूंनी प्रतिदिन १ घंटा राष्ट्र आणि धर्मजागृती कार्यास देण्याचा संकल्प केला.

२. व्याख्यानानंतर उपस्थितांनी वक्त्यांना भेटून व्याख्यान स्फर्तिदायक झाल्याचे सांगितले.

३. सर्वच ठिकाणी उपस्थित शिवप्रेमींनी व्याख्यानाच्या अखेरपर्यंत थांबून व्याख्यान ऐकले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *