तुळजापूर : येथे १५ मार्च या दिवशी श्री तुळजाभवानी देवस्थान संरक्षण कृती समितीची बैठक पार पडली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी श्री महंत मावजीनाथ यांची भेट घेतली. मंदिरातील पावित्र्य, प्रथा-परंपरा यांचे पालन होण्यासाठी आणि प्रशासनामुळे त्यात येणारे अडथळे दूर होण्यासाठी नियमित स्वरूपात विविध आंदोलने, कृती आणि निवेदन देण्याचे निश्चित झाले. यासाठी प्रत्येकी १५ दिवसांनी कृती समितीची बैठक घेेण्याचे ठरले. बैठकीला कृती समितीचे सदस्य शिवबा राजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन साळुंखे उपस्थित होते. ‘कृती समितीच्या आंदोलनांमध्ये आम्ही पूर्ण सहभागी असणार आहोत’, असे त्यांनी सांगितले.
पंढरपूर येथे १६ मार्च या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीची बैठक पार पडली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये आणि कृती समितीचे सदस्य श्री. गणेश लंके, वैभव बडवे, श्रीराम बडवे, वीरेंद्र उत्पात महेशाचार्य उत्पात, राजन बुणगे, अधिवक्ता नीलेश सांगोलकर उपस्थित होते.
बैठकीत मंदिर समितीच्या अंतर्गत असलेल्या गोशाळेतील गायींचा उपासमारीने मृत्यू झाल्याविषयी २४ मार्चला दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत येथील शिवाजी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्याचे निश्चित झाले. मंदिरात कर्मचार्यांकडून पावित्र्य भंग होत आहे. त्याच्या विरोधातही जनआंदोलन, निवेदन, तक्रार देण्याचे ठरले. तसेच प्रत्येक १५ दिवसांतून कृती समितीची बैठक घेण्याचे निश्चित झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात