Menu Close

मध्यप्रदेशात आहे देशातील एकमेव सीता मंदिर

भारतात देवळे व मंदिरांची संख्या जास्त असली तरी रामाचे मंदिर म्हणजे सीताराम मंदिर असेच मानले जाते. सीतेचा समावेश पंचकन्यांमध्ये होत असला तरी देशात सीता मातेचे स्वतंत्र मंदिर पाहायला मिळत नाही. मध्यप्रदेशाच्या अशोकनगर जिल्ह्यातील करिला या छोट्या गावात सीतामाईचे मंदिर असून हे देशातील बहुदा एकुलते एक मंदिर असावे असे म्हटले जाते. विशेष म्हणजे रामाने सीतेचा त्याग केल्यानंतर ती वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात येऊन राहिली व येथे तो आश्रम होता असेही म्हटले जाते. येथेच सीतेने लव व कुश यांना जन्म दिला होता असेही मानले जाते.

रंगपंचमी दिवशी या छोट्याशा गावात प्रचंड मोठी जत्रा भरते. राजस्थान, उत्तरप्रदेशातून सुमारे २५ लाख भाविक येथे दर्शनासाठी तसेच नवसफेडीसाठी येतात. असे सांगितले जाते कि, या मंदिरात सीता मातेचे दर्शन घेऊन आपली मनोकामना व्यक्त करायची. इच्छा पूर्ण झाली की पुन्हा दर्शनासाठी यायचे व नवसफेडीसाठी बेडनींचे नृत्य ठेवायचे. या भागातील बेडिया या जमातीचा उदरनिर्वाह नाच गाणी करूनच चालतो व रंगपंचमीलाच हा नवसफेडीचा सोहळा होतो त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी या गावाचा सारा नूरच पालटलेला असतो.

नवसफेडीसाठी किंवा सीतामाईच्या दर्शनासाठी येणारे भाविक माता सीतेला गुलाल वाहतात तसेच बेडिया नाचातच गुलालाचा प्रचंड प्रमाणात वापर केला जातो. लोककथेनुसार येथेच वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता व सीतेने येथेच लवकुश यांना जन्म दिला तेव्हा मोठा उत्सव साजरा केला गेला व देवांनीही येथे उपस्थिती लावली. तेव्हा अप्सरांचे नृत्य झाले. त्यामुळे आजही येथे बेडिया नाच परंपरा म्हणून पाळली जाते.

संदर्भ : माझा पेपर

Tags : Hinduism

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *