पैठण येथील वारकरी महाअधिवेशनामध्ये वारकर्यांची एकमुखी मागणी
वारकर्यांना अशी मागणी करावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद !
श्रीक्षेत्र पैठण (जिल्हा संभाजीनगर) : सरकारीकरण असलेल्या पंढरपूर देवस्थानमधील घोटाळ्याची गुन्हे अन्वेषण यंत्रणेच्या वतीने चौकशी करा, अशी एकमुखी मागणी पैठण येथे झालेल्या वारकरी महाअधिवेशनात करण्यात आली. येथील श्री गाढेश्वर मंदिराजवळील संतश्री ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान (आपेगाव) फड येथे १८ मार्च या दिवशी शेकडो वारकर्यांच्या उपस्थितीत वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा पार पडली.
सर्व तीर्थक्षेत्रे केवळ उत्सव आणि वारी यांच्यावेळी नाही, तर कायमस्वरूपी मद्य-मांस मुक्त करावीत, गोवंश हत्याबंदी कायदा संपूर्ण देशभरात लागू करावा, कसायांवर कठोर कारवाई करावी आणि गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करावी, तसेच मंदिरांवरील सर्व सरकारी समित्या विसर्जित करून सर्व मंदिरे भक्तांकडे सोपवावीत, अशा प्रमुख मागण्या या वेळी करण्यात आल्या. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पैठणनगरीत झालेल्या या धर्मसभेच्या निमित्ताने वारकरी आणि संस्कृतीप्रेमी यांनी धर्मरक्षण अन् राष्ट्ररक्षण यांसाठी कटिबद्ध होण्याचा निर्धार व्यक्त केला. या अधिवेशनाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी केले. अधिवेशनाची सांगता पसायदानाने झाली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात