सौदी अरब हा जगातील दहशतवादी निर्माण करणारा सर्वात मोठा कारखाना आहे, असा थेट आरोप इराणच्या एका बड्या नेत्याने केला आहे. सौदीचे राजे सलमान यांनी दहशतवादी तयार करण्याचा सर्वात मोठा कारखाना सौदी अरबमध्ये उघडला आहे, असे या नेत्याने म्हटले आहे.
इराणच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या उच्च परिषदेचे चिटणीस असलेले शमखानी यांनी हा घणाघात केला आहे. अमेरिकेचे पैट्रो डॉलर सध्या घृणा, द्वेष, हिंसा आणि अत्याचाराच्या सेवेत खर्च होत आहेत. सामान्य जनतेत राजे सलमान यांच्याबद्दल तिटकारा असल्याचे चांगले ठाऊक असूनही अमेरिकेचे सरकार सौदी सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करत नाही. उलट त्याचे उघड समर्थन करते, असे ते म्हणाले.
याच्या उलट सौदी अरबचे युवराज आणि संरक्षण मंत्री मुहम्मद बिन सलमान यांनी इराणवरच दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप केला आहे. शुक्रवारी वॉशिंग्टन येथे त्यांची अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यासोबत बैठक झाली. त्यावेळी ते म्हणाले, की इराण दहशतवादाचे समर्थन करत असून त्यामुळे पश्चिम आशिया व जगासाठी धोका वाढत आहे.
संदर्भ : माझा पेपर