Menu Close

अमेरिकेत हिंदुत्वाचा वाढता प्रभाव !

‘आज पाश्‍चात्त्य आणि अमेरिकी राष्ट्रांमध्ये हिंदु धर्माकडे सामान्य लोक अधिकाधिक आकर्षित होत आहेत. एकेकाळी संपूर्ण अमेरिका खंडात ख्रिस्ती धर्माचा पगडा होता; परंतु आज असे पहावयास मिळते की, अमेरिका आणि कॅनडा यांसारख्या देशांमध्ये हिंदुत्वाचे विचार लोकांना अधिकाधिक भावत आहेत. अमेरिका आणि कॅनडा येथील ख्रिस्ती मिशनरी या वाढत्या हिंदु जिव्हाळ्यापुढे हतबल होतांना दिसून येत आहेत.

१. अमेरिका आणि कॅनडा मध्ये हिंदूंची संख्या लक्षणीय !

काही दिवसांपूर्वी डग्लस टाड या पाश्‍चात्त्य लेखकाने लिहिले होते की, ‘आम्ही हिंदू होत चाललो आहोत का ?’ गेल्या वर्षीसुद्धा ‘टाईम्स’मध्ये एक लेख प्रकाशित झाला होता. त्याचे शीर्षकसुद्धा ‘आम्ही हिंदू झालो आहोत’, असेच होते. तिकडे वृत्तपत्रांमध्ये अशा प्रकारचे लेख प्रकाशित होणे आता नित्याचेच झाले आहे. याचे कारण भारतातून गेलेले हिंदू खूप मोठ्या संख्येत आहेत. वर्ष २००१ च्या जनगणनेनुसार कॅनडामध्ये तीन लाख बहात्तर सहस्त्रांपेक्षा अधिक तर अमेरिकेत ११ लाखांपेक्षा अधिक हिंदू रहातात.

२. हिंदु परंपरा आणि हिंदूंच्या मनमिळाऊ स्वभावामुळे प्रभावित !

अमेरिका आणि कॅनडा या राष्ट्रांमध्ये गेलेले हे हिंदू तेथे हिंदु धर्माच्या परंपरांप्रमाणे रहातात; तसेच विविध सण आणि उत्सव साजरे करतात. हिंदू तेथील स्थानिक लोकांनाही आपल्या धार्मिक उत्सवांत सहभागी करून घेतात. त्यामुळे पाश्‍चात्त्यांना, विशेषत: अमेरिकी लोकांना हिंदु धर्म आणि उत्सव म्हणजे नेमके काय आहे, याची उत्कंठा निर्माण होते. ते यांमागे असलेली माहिती जाणून घेतात. तेव्हा त्यांना त्यामागची कारणमीमांसा दिसून येते. होळीतील रंग खेळणे, दिवाळीतील फटाक्यांची आतषबाजी, विविध सणांना केले जाणारे विविध विशेष पदार्थ, पक्वान्न आणि विशेष भारतीय मिठाई यांची देवाणघेवाण होते. भारतीय महिला परिधान करीत असलेली साडी, नाकातील नथ, पायातील पैंजण या गोष्टी असो अथवा तिळाचे लाडू, पुरणपोळी किंवा जिलेबी असो. याचे ख्रिस्ती लोकांना मोठे अप्रूप वाटते. भारतीय लोकांचे वागणे, राहणीमान आणि आपुलकीचा अन् आतिथ्यशीलतेचा स्वभावसुद्धा लोकांची मने जिंकल्याशिवाय रहात नाही.

३. हिंदु धर्माचे दर्शन ‘भय किंवा प्रलोभन दाखवणारे नाही’ !

अर्थात् या वरवरच्या गोष्टींकडे स्थानिक लोक आकर्षित होत आहेत, असे अजिबात नाही. कारण तेथील नागरिक सुस्पष्ट वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे असतात. एखादी गोष्ट आवडली की, ते सरळ त्याच्या खोलात शिरून सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न करू लागतात. हिंदु धर्माचे लोक किंवा हिंदु धर्माचे दर्शन ‘भय किंवा प्रलोभन दाखवणारे नाही’, याची त्यांना खात्री पटते.

४. हिंदु धर्मातील व्यापकत्व

या सर्व कारणांमुळे गेल्या दोन दशकांमध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये हिंदु धर्म अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. तेथे आयुर्वेद, ध्यान केंद्रे आणि योग केंद्रे मोठ्या प्रमाणात चालू होत आहेत. महेश योगी, ओशो रजनीश किंवा स्वामी चिन्मयानंद यांच्या केंद्रांतून अभ्यास किंवा साधना करणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे. ‘हरे रामा हरे कृष्णा’पासून (‘इस्कॉन’ या संप्रदायापासून) ते साईभक्तांपर्यंत अनेकांचे जत्थे येथे पहावयास मिळतील. ख्रिस्ती पंथ मृत व्यक्ती आणि स्वर्ग यांत एका पावलाचे अंतर आहे, असे मानतो; परंतु ही धारणा आता कमी होत चालली आहे. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून शरीर अन् आत्मा यांचे तादात्म्य साध्य करायचे, याचे प्रयोग अधिक व्यापक प्रमाणात होऊ लागले आहेत. केवळ विचारांमध्ये खुलेपणा आणि स्वातंत्र्य असल्यामुळे आम्ही हिंदु धर्म मानतो, असे ते सांगतात. ईश्‍वराला माना किंवा न माना, मूर्तिपूजा करा अथवा न करा, शाकाहारी असा अथवा नसा, तुम्ही हिंदू असू शकता, हे मोठेच स्वातंत्र्य आहे. एवढा व्यापक धर्म जगाच्या पाठीवर दुसरा नाही.’

– मुझफ्फर हुसेन (साभार : दैनिक सामना, १३.९.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *