हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा
चितवन (नेपाळ) : धर्मात विकृती नाही, तर धर्मशिक्षणाच्या अभावामुळे समाजात विकृती आहे. ही विकृती दूर करण्यासाठी केवळ बौद्धिक स्तरावर धर्म शिकवून चालणार नाही; कारण मन आणि बुद्धी अशुद्ध असेल, तर विकृती दूर होणार नाही. त्यासाठी साधना करून मन आणि बुद्धी शुद्ध केली पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथे केलेे. राष्ट्रीय धर्मसभा नेपाळ, जिल्हा समिती, चितवनच्या वतीने येथील दुर्गा मंदिरात पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे हिंदुु धर्माभिमान्यांसाठी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. मार्गदर्शनानंतर ‘आवास टी.व्ही.’चे पत्रकार श्री. आनंद पोखरेल यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना पू. डॉ. पिंगळे बोलत होते.
पू. डॉ. पिंगळे त्यांच्या मार्गदर्शनात म्हणाले, ‘‘धर्म हा कर्म प्रधान आणि आचरण प्रधान आहे. केवळ बोलण्यात धर्म आणि कर्मात अधर्म असे चालत नाही. धर्म प्रत्येकाचे कर्तव्य सांगतो. जर समाज धर्मनिरपेक्ष झाला, तर समाज आणि राष्ट्र रसातळाला जाते. पशुपतिनाथ, मुक्तिनाथ, कैलास यांना जागृत ठेवायचे असेल, तर आपण धर्मपालन आणि अधर्माचा विरोध केला पाहिजे.’’
मेरुतंत्रातील हिंदु धर्माची व्याख्या सांगताना ते पुढे म्हणाले, ‘‘आपण कितीही उपासना केली, तरी जोपर्यंत आसुरी दोष म्हणजे काम, क्राध, लोभ, मोह आणि अहंकार आपल्याकडे आहेत, तोपर्यंत आपण असुरच बनणार. तसेच केवळ धर्मकर्तव्य पार पाडल्याने होत नाही, तर अधर्माच्या विरोधात कार्यरतही राहिले पाहिजे. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी विदुराने अधर्माचा विरोध केला म्हणून श्रीकृष्ण त्याच्या घरी गेला.’’
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय धर्मसभा नेपाळच्या केंद्रीय समितीचे सदस्य श्री. प्रकाश ढकाल यांनी केले. राष्ट्रीय धर्मसभा नेपाळचे सचिव श्री. रामचंद्र पिया, चितवन जिल्हाध्यक्ष श्रीमती मुना गुरुंग, सदस्य श्रीमती सरिता श्रेष्ठ, शब्द चिंतन संघाचे कार्यवाहक अध्यक्ष श्री. भगिरथ न्योपाने, वैदिक सनातन हिंदु धर्मचे माधव प्रसाद लामिछाने, तसेच येथील अन्य हिंदु संगठनाचे काही कार्यकते उपस्थित होते.
नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी झटणार्या राजकीय पक्षाची गळचेपी !
नेपाळच्या राजकीय पक्षाच्या घटनेतून ‘हिंदु राज्य’ शब्द हटवण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश
काठमांडू : नेपाळच्या निवडणूक आयोगाने येथील राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी या पक्षाच्या घटनेतून ‘राजेशाही’ आणि ‘हिंदु राज्य’ हे शब्द हटवण्याचा आदेश दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष कमल थापा यांनी आयोगाच्या या आदेशाचा विरोध केला आहे. ‘आयोगाने असा आदेश देऊन पक्षाचा आत्माच काढून घेतला आहे. पक्षाकडून आयोगाच्या आदेशाच्या विरोधात न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. वर्ष २००८ मध्ये नेपाळमधील राजेशाही संपुष्टात आल्यानंतर राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत,’ असे ते म्हणाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात