रणरागिणीची राज्य महिला आयोगाकडे मागणी
पणजी : विकृत व्टीट करणार्या रामगोपाल वर्मा यांच्यावर कारवाई करा, मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी शाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग सक्तीचे करा, कदंब परिवहन मंडळाच्या बसगाड्यांवरील आणि रस्त्याच्या बाजूने लावण्यात आलेल्या अश्लील विज्ञापनफलकांवर कारवाई करा, अशा मागण्या हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या शिष्टंमडळाने गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. विद्या शेट तानावडे यांची २१ मार्च या दिवशी भेट घेऊन केल्या. या वेळी रणरागिणीच्या शिष्टंमडळामध्ये सौ. मीना कामत, सौ. राजश्री गडेकर, सौ. शुभा सावंत आणि सौ. अक्षता कुमठेकर यांचा सहभाग होता. या वेळी महिला आयोगाच्या अन्य सदस्याही उपस्थित होत्या.
नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत रहाणारे चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी जागतिक महिला दिनी सनी लियॉन पुरुषांना जितके सुख देते, तितके सुख सर्व महिलांनी पुरुषांना द्यावे, अशी अभद्र शुभेच्छा महिलांना जाहीरपणे देत त्यांची मानसिकता किती खालच्या स्तराची आहे, हेच दाखवले होते. राम गोपाल वर्मा यांच्या या वादग्रस्त व्टीटच्या विरोधात रणरागिणी शाखेने पोलीस आणि गोवा राज्य महिला आयोग यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. तक्रारीनंतर राम गोपाल वर्मा यांनी विकृत व्टीटसंदर्भात माफी मागण्याचे नाटक केले होते, तसेच यानंतर होळीच्या सणाच्या वेळीही अश्लाघ्य भाषेत महिलांचा अनादर करणारे व्टीट केले होते. रणरागिणी शाखेच्या शिष्टमंडळाने राज्य महिला आयोगाला ही माहिती पुराव्यासह सुपुर्द केली.
रणरागिणी शाखेच्या तक्रारीनंतर राज्य महिला आयोगाच्या आदेशावरून कदंब परिवहन मंडळाच्या बालरथावरील अश्लील विज्ञापनफलक हटवण्यात आले आहेत. मंडळाच्या अन्य बसगाड्यांवरील अशाच प्रकारचे अश्लील विज्ञापनफलक हटवावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या अश्लील हॉर्डिंगवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. एखाद्या ठिकाणी होर्डिंग लावतांना ४० सूत्रे असलेल्या एका नियमावलीचे पालन करणे आवश्यक असते; मात्र याचे पालन होते कि नाही हे पहाणे आवश्यक असल्याचे महिला आयोगाने रणरागिणी शाखेच्या शिष्टमंडळाला सांगितले. बार्देश तालुक्यात वेर्ला, काणका येथे दुसर्या इयत्तेत शिकणार्या बालिकेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याची घटना नुकतीच घडली आहे. वास्को येथेही एका विद्यार्थिनीवर शाळेच्या आवारात बलात्कार करण्याची घटना यापूर्वी घडली आहे. विद्यार्थिनीवर होणारे हे अत्याचार रोखण्यासाठी विद्यालयांमधून स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे काळाची आवश्यकता असल्याचे रणरागिणी शाखेने आयोगाला सांगितले. रणरागिणीच्या सर्व मागण्यांची पूर्तता करण्यासंदर्भात आयोगाने सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात