हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा
काठमांडू (नेपाळ) : जेव्हा राजसत्तेला धर्माचे मार्गदर्शन मिळते आणि धर्माधिष्ठित राजकारण केले जाते, तेव्हा समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांची भौतिक तसेच आध्यात्मिक उन्नती होते अन् समाजव्यवस्था उत्तम रहाते. याउलट जेव्हा राजकारण धर्माला अंकित करते तेव्हा स्वार्थी आणि सत्तालोलुप राजा धर्म, समाज आणि राष्ट्र यांमध्ये विकृती निर्माण करतो. त्यामुळे समाजात अराजकता निर्माण होऊन विनाश अटळ ठरतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील ‘टी.व्ही. टुडे जनकपूर’ या वाहिनीवरील ‘रियल टॉक’ या कार्यक्रमात केले.
या वेळी त्यांनी धर्मनिरपेक्ष नेपाळची सद्यस्थिती, नेपाळमध्ये भारताप्रती वाढत असलेला असंतोष, नेपाळ हिंदु राष्ट्र घोषित होण्याची संभावना इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा केली. ‘बहुपक्षीय लोकशाही चांगली आहे, तर लोकशाहीचे जनक असलेले इंग्लंड ती सोडून त्यांच्या देशात द्विपक्षीय लोकशाही का राबवते ?’ असा प्रश्नही या वेळी पू. डॉ. पिंगळे यांनी केला.
क्षणचित्रे
१. नेपाळमध्ये होणार्या सनातन हिंदु महासंमेलनाचे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांना निमंत्रण : नेपाळ पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित व्हावे, यासाठी येथील १३३ संघटनांनी सनातन हिंदु मोर्चाची स्थापना केली होती. या संघटनेच्या वतीने एप्रिलमध्ये होणार्या सनातन हिंदु महासंमेलनाचे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांना निमंत्रण देण्यात आले.
२. नेपाळ दौर्यात कोईराला सेवा समाज, नेपाळ आणि महर्षि मुद्गल समाजाचे अध्यक्ष श्री. रुबयनाथ कोईराला, कोइराला सेवा समाजचे श्री. जीवनचंद्र कोईराला, ‘हिंदु युवा संयोजन’चे श्री. सागर मांडव आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत ‘सार नेपाळ संघटने’च्या अध्यक्षा सौ. आरती मांडव यांची पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सदिच्छा भेट घेतली.
नेपाळमध्ये भारताप्रमाणेच होत असलेली हिंदुत्वनिष्ठांची गळचेपी !
नेपाळ पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठ पक्षाच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार
काठमांडू : येथे आंदोलन करणार्या हिंदुत्वनिष्ठ राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी (आर्पीपी) च्या कार्यकर्त्यांवर नेपाळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत लाठीमार केला. यात १२ हून अधिक हिंदु कार्यकर्ते घायाळ झाले. नेपाळच्या निवडणूक आयोगाने या पक्षाच्या घटनेतून ‘राजेशाही’ आणि ‘हिंदु राष्ट्र’ हटवण्यास सांगितल्याच्या निषेधार्थ येथे निदर्शने करण्यात येत होती. पक्षाचे अध्यक्ष कमल थापा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर दडपशाही केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात