१५ सहस्रांहून अधिक वारकरी उपस्थित
आळंदी (पुणे) : वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सवाला २२ मार्च या दिवशी प्रारंभ झाला आहे. सोहळ्याला पहिल्या दिवशी १५ सहस्रांहून अधिक वारकरी उपस्थित होते. यात अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यासमवेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहात प्रतिदिन श्रीरामकथेचे आयोजन केले आहे. रामायणाचार्य ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक यांनी कथेचा पहिला भाग सांगितला. ‘समाजाला छत्रपती शिवाजी महाराज हवे असतील, तर त्यासाठी माता जिजाऊ जन्मल्या पाहिजेत; म्हणूनच भ्रूणहत्या होऊ देऊ नका’, असेही त्यांनी सांगितले.
वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्याला आशीर्वाद ! – श्रीसच्चिदानंद विद्यानरसिंहभारतीस्वामी
संकेश्वर येथील जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठाचे श्रीसच्चिदानंद विद्यानरसिंहभारतीस्वामी यांनी वारकरी शिक्षण संस्था करत असलेल्या कार्याला शुभाशीर्वाद देतांना म्हटले, ‘‘संस्थेला १०० वर्षे होणे, ही आनंदाची गोष्ट आहे.
ही संस्था स्थापन करणार्या सद्गुरु जोग महाराजांची साधना आहे. त्यांच्या साधनेमुळेच हे सर्व कार्य चालू आहे. काही वर्षांपूर्वी माझ्याकडे त्यांच्या काही पुरातन वस्तू आल्या होत्या. त्या वेळी मला त्यांचा अर्थ उमगला नाही; पण आज या महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्याशी असलेले ऋणानुबंध लक्षात आले. त्यानिमित्ताने त्यांचा आशीर्वादच मिळाला आहे. संस्थेच्या कार्याला माझे आशीर्वाद आणि शुभेच्छा !’’
शंकराचार्य श्रीसच्चिदानंद विद्यानरसिंहभारतीस्वामी यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला आशीर्वाद
सोहळ्याच्या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांच्या शौर्यगाथा सांगणार्या माहितीचे प्रदर्शन, तसेच सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात आले. समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी शंकराचार्य श्रीसच्चिदानंद विद्यानरसिंहभारतीस्वामी यांची भेट घेतली. त्यांनी दैनिक सनातन प्रभात पाहून सनातन संस्था आणि समिती यांच्या कार्याला आशीर्वाद दिले. श्री. घनवट यांनी शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद महाराज आणि श्री. अर्जुन महाराज खाडे यांची भेट घेऊन त्यांचेही आशीर्वाद घेतले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात