ब्रिटनच्या संसदेजवळ हल्ला करणारा हल्लेखोर ब्रिटनमध्येच जन्मलेला होता आणि गुप्तचर यंत्रणांनी काही वर्षांपूर्वी त्याची चौकशीही केली होती, अशी माहिती ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी दिली आहे. दरम्यान, आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे.
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर थेरेसा मे यांनी आपत्कालीन बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. हल्लेखोर ब्रिटनमध्ये जन्मलेला होता हे स्पष्ट झाले आहे. तो कट्टरपंथी होता. हिंसक कारवायांमुळे त्याची गुप्तचर यंत्रणांनी चौकशी केली होती मात्र सध्या त्याची कोणत्याही प्रकारची चौकशी सुरू नव्हती, असे थेरेसा मे यांनी नमूद केले. हा हल्ला विकृत मानसिकतेतून करण्यात आला आहे. मात्र अशा हल्ल्यांनी आम्ही अजिबात घाबरून जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.
लंडन हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा ठिकाणी छापे टाकले असून सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख मार्क रॉवेल यांनीही हल्ल्याबाबत अधिक माहिती दिली. हल्लेखोर एकच होता. त्याने संसद इमारतीच्या दिशेने भरधाव कार आणताना किमान पाच लोकांना चिरडले. रेलिंगला कार धडकल्यानंतर त्याने संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावरही चाकूने वार केले. अधिकाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्याने ऐकले नाही. त्याने अंदाधुंद गोळीबार केला. अनेक राउंड फायर करण्यात आल्या. त्यावेळी प्रत्युत्तरादाखल झालेल्या गोळीबारात तो मारला गेला, असे त्यांनी नमूद केले. हा हल्लेखोर इस्लामिक दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादाने प्रभावित होता, असेही त्यांनी नमूद केले.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स