मंदिरावरील संभाव्य कारवाईच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्याचा भाविकांचा निर्णय
हिंदूंची मंदिरे अवैध ठरवून ती तत्परतेने पाडण्याची मर्दुमकी दाखवणारे प्रशासन अवैध मशिदी पाडण्याचे आणि त्यावरील भोंगे उतरवण्याचे धाडस दाखवत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : शिवडीतील टी.जे. मार्गावर ७६ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या कलेश्वरनाथ हनुमान मंदिराला महापालिकेने अनधिकृत ठरवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मंदिर पाडण्याविषयीची नोटीस दिली होती. त्यानुसार २३ मार्चला सकाळी ९ वाजता मंदिर पाडण्यात येणार होते; मात्र पालिकेचे पथक मंदिराच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच शेकडो भाविक मंदिरासमोर संघटित झाले. हनुमान आणि श्रीराम यांचा जयघोष करत परिसर दणाणून सोडला. भाविकांचा प्रक्षोभ पाहून पालिका अधिकार्यांनी मंदिर परिसरात येण्याचे टाळले. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून भाविकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
शिवडी पश्चिमेतील टी.जे. मार्गावर वर्ष १९३१ मध्ये मफतलाल इंडस्ट्रीजच्या वतीने कलेश्वरनाथ हनुमान मंदिराची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून जागृत देवस्थान म्हणून मंदिराची ख्याती परिसरात पसरली आहे. या मंदिरात सण, धार्मिक उत्सव नियमितपणे आणि उत्साहात साजरे केले जातात. या मंदिरात भाविकांची सतत वर्दळ असते. मंदिरावर कारवाई होणार असल्याचे लक्षात येताच २३ मार्च या दिवशी शेकडो भाविकांनी सकाळीच मंदिराकडे धाव घेतली.
अनधिकृत मंदिरांवर कारवाई करण्याविषयी महापालिकेने अ आणि ब असे दोन गट सिद्ध केले असून वर्ष १९६० पूर्वी बांधण्यात आलेल्या मंदिरांना अ गटात आणि त्यानंतरच्या मंदिरांना ब गटात समाविष्ट करण्यात आले आहे. ब गटातील मंदिरांवर पालिका कारवाई करणार आहे. कलेश्वरनाथ हनुमान मंदिर वर्ष १९३१ मध्ये बांधण्यात आले असून त्यानंतरचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत. तरीही पालिकेने मंदिराला ब गटात समाविष्ट केले आहे. पालिकेच्या या निर्णयाच्या विरोधात आणि मंदिरावरील कारवाई रहित करण्याविषयी आम्ही न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहोत, असे स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात