गेल्या काही दिवसांपासून ‘फिल्लौरी’ विषयीच्या विविध चर्चांना उधाण आले आहे
अनुष्का शर्माची निर्मिती असलेल्या ‘फिल्लौरी’ या चित्रपटातील एका दृश्यावर सेन्सॉरने आक्षेप घेत ते दृश्य चित्रपटातून वगळण्याचा सल्ला दिला आहे. चित्रपटातील एका दृश्यामध्ये अभिनेता सूरज शर्मा बाथटबमध्ये ‘शशी’च्या भटकत्या आत्म्याला पाहून घाबरतो आणि त्या भितीने तो हनुमान चालिसेचा जप करण्यास सुरुवात करतो, असे दृश्य दाखवण्यात आले आहे. याच दृश्यावर हरकत घेत सेन्सॉरने चित्रपटातून ते दृश्य काढून टाकण्यास सांगितले.
हनुमान चालिसेचा सतत जप केल्यामुळे ते भूत जाईलच असे नाही. त्यामुळे या दृश्यातून अंधश्रद्धेस सुद्धा वाव मिळू शकतो, म्हणूनच या दृश्याला सेन्सॉरची हरकत आहे. त्यासेबतच या दृश्यामुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, असेही कारण देण्यात येत आहे.
‘द क्वींट’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या चित्रपटातील हनुमान चालिसा हटवण्यात आली असून, आता अभिनेता सूरज शर्मा हनुमान चालिसा नव्हे तर कोणत्यातरी एका मंत्राचा जप करताना दिसणार आहे. पण, हा जप प्रेक्षकांना मात्र ऐकू येणार नाही.’ त्यामुळे आता नेमके हे दृश्य चित्रपटातून वगळण्यात आले आहे की नाही हे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर कळणारच आहे.
संदर्भ : लोकसत्ता