Menu Close

ढाक्यात आत्मघाती बॉम्बहल्ला, आयसिसने जबाबदारी स्वीकारली

बांगलादेशची राजधानी ढाका येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एका आत्मघातकी बाँबरने स्वत:ला उडवून दिले. इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. येथून जवळच असलेल्या बांगलादेशच्या Rapid Action Battalion रॅपिड अॅक्शन बटालियनच्या शिबिरावर झालेल्या अशाच प्रकारच्या हल्ल्यानंतर आठवडाभराने हा हल्ला झाला आहे.

जीन्स व शर्ट अशा वेशातील बाँबर तिशीतील तरुण असल्याचे सांगण्यात आले. हझरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका पोलीस चौकीनजिक त्याने स्वत:च्या कंबरेला बांधलेली स्फोटके उडवून दिली. हल्लेखोराची ओळख लगेच पटू शकलेली नाही. या हल्लेखोराने पोलीस चौकीसमोर बाँबचा स्फोट केला व नंतर स्वत:ला उडवून दिले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने वार्ताहरांना सांगितले.

या हल्लेखोराजवळ आणखी तीन बाँब भरलेली एक ट्रॉली बॅग होती. बाँबनाशक पथकाने नंतर नियंत्रित स्फोटाद्वारे तिचा स्फोट घडवून आणला असता एका पोलिसासह पाच जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या हल्लेखोराचा उद्देश पोलीस चौकीवर हल्ला करण्याचा होता, मात्र विमानतळावरील कडक बंदोबस्तामुळे त्याला त्यापूर्वीच आत्महत्या करणे भाग पडले, असे ढाक्याचे पोलीस आयुक्त असदुझ्झमान मिया यांनी पत्रकारांना सांगितले. बीडीन्यूज२४ डॉट कॉम च्या वृत्तानुसार, बहुधा विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळील सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी हल्लेखोराने त्याच्याजवळील बाँबचा स्फोट केला.

संदर्भ : लोकसत्ता

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *