नवी दिल्ली : “एनसीईआरटी‘ने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात इतिहासातील काही महत्त्वाच्या व्यक्ती आणि क्रांतिकारकांबाबतच्या इतिहासाचा समावेश न केल्याबद्दल मुख्य माहिती आयुक्तांनी (सीआयसी) आज ताशेरे ओढले. “एनसीईआरटी‘ने याबाबत स्वतःहून दखल घेत खुलासा करावा, असा आदेश मुख्य माहिती आयुक्तांनी दिला आहे.
या संदर्भात जयपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी (आरटीआय) दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य माहिती आयुक्तांनी हा निर्णय दिला. स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि इतर काही क्रांतिकारकांबाबतचा मजकूर कमी करण्यात आल्याबद्दलही स्पष्टीकरण देण्याचे आदेश “एनसीईआरटी‘ने दिले आहेत.
चंद्रशेखर आझाद, अश्फाकउल्ला खान, बटुकेश्वर दत्त, रामप्रसाद बिस्मील आदी इतर महत्त्वाच्या व्यक्तींचाही “एनसीईआरटी‘च्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही, यास याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. पाठ्यपुस्तकांमधील मजकूर ठरविण्याचा अधिकार असलेल्या स्वतंत्र समितीच्या कामात “एनसीईआरटी‘ हस्तक्षेप करत नाही, असे स्पष्टीकरण “एनसीईआरटी‘च्या वतीने बोलताना नीरज रश्मी यांनी सुनावणी वेळी दिले.
संदर्भ : सकाळ