हुतात्मा राजगुरु क्रांती गौरव आणि क्रांती जागर पुरस्कारांचे वितरण
राजगुरुनगर (जिल्हा पुणे) : सध्या ख्रिस्ती, मुसलमान आणि आखाती देश यांनी त्यांचा पैसा दूरचित्रवाहिन्यांमध्ये गुंतवला असल्याने त्या माध्यमातून हिंदु धर्माची अपकीर्ती केली जाते. हिंदु साधू आणि संत यांची विश्वासार्हता संपुष्टात आणण्याचे कामही पद्धतशीरपणे चालू आहे. हे हिंदु धर्माविरुद्धचे षड्यंत्र आहे, असा आरोप ‘सुदर्शन न्यूज’चे अध्यक्ष श्री. सुरेश चव्हाणके यांनी केला. ते राजगुरुनगर येथे पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.
हुतात्मा राजगुरु, भगतसिंग आणि सुखदेव यांच्या बलीदानदिनानिमित्त बजरंग दल खेड प्रखंड यांचे वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेेखनीय काम करणार्या श्री. बापू बिरु वाटेगांवकर (बोरगांव, जि. सांगली) यांना ‘हुतात्मा राजगुरु क्रांती गौरव’, तर सुदर्शन वाहिनीचे अध्यक्ष श्री. सुरेश चव्हाणके यांना ‘हुतात्मा राजगुरु क्रांती जागर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी श्री. चव्हाणके म्हणाले की, ‘‘संस्कारहीन मालिका दाखवून समाजाला अधोगती कडे नेण्याचे काम सध्याच्या वाहिन्यांकडून होत आहे. सध्याच्या वाहिन्या दर्शकांना बकरा बनवत आहेत; परंतु सुदर्शन वाहिनी दर्शकांना वाघ बनवण्याचे काम करणार आहे. देशात हिंदू आणि क्रांती यांचे विचार पोहोचवण्याचे काम सुदर्शन वाहिनीद्वारे केले जाईल. हुतात्मा राजगुरूंचे जागतिक स्तरावरील स्मारक होण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य केले जाईल.’’
पुरस्कार मिळाल्यावर मनोगत व्यक्त करतांना श्री. बापू बिरु वाटेगांवकर म्हणाले की, जीवनात नेहमी खर्याचे समर्थन करा. अन्याय करू नका आणि अन्याय सहनही करू नका. अन्याय करणार्याला सोडू नका. मरणाला भिऊ नका. मरण आल्यावर ते थांबणार नाही. व्यसनांपासून दूर रहा. परिश्रम करा. शक्ती वाढवा. नियमित व्यायाम करा.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात