वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवात मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार
श्रीक्षेत्र आळंदी (पुणे) : वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्याला १०० वर्षे पूर्ण होऊन दुसरे शतक आरंभ होत आहे. येणारे शतक हे केवळ भारताचे नसून हिंदुत्व आणि वारकरी संप्रदाय यांचे असणार आहे. त्यातून विश्वाला मार्गदर्शक असे ज्ञान दिले जाणार आहे, असे मार्गदर्शन प.पू. स्वामी गोविंददेव गिरी (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांनी केले. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. या वेळी व्यासपिठावर श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज, ह.भ.प. रामेश्वर शास्त्री महाराज, राष्ट्रीय वारकरी सेनेचे संस्थापक ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते, ह.भ.प. मारुति महाराज कुर्हेकर, संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. संदीपान महाराज हसेगांवकर आदींसह वारकरी संप्रदायातील अनेक संत आणि महंत उपस्थित होते.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरी पुढे म्हणाले की, सध्या देशात जो भगवा दिसतो आहे, तो वारकर्यांचा भगवा आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते वैश्विक आहेत. त्यांचे ग्रंथ आणि साहित्य हे जगभरातील सर्व भाषांमधून मांडले पाहिजेत. मराठी भाषा ही सर्वांत भाग्यवान भाषा असून संत ज्ञानेश्वरांपासून ते आतापर्यंत अनेक संतांनी मराठीतच अनेक ग्रंथसंपदा निर्माण केली आहे.
वारकरी शिक्षण संस्था ही जीवनाचे शिक्षण देणारी संस्था !
संस्थेविषयी गोैरवोद्गार काढतांना ते म्हणाले की, वारकरी शिक्षण संस्था ही सर्वांना मार्गदर्शक आहे. बाहेर व्यवहारात मिळणारे शिक्षण हे उपजीविकेचे, तर येथे जीवनाचे शिक्षण दिले जाते. येथे आपला भाव, पेहराव, मनन, चिंतन कोणते आणि कसे असावे, हे शिकवले जाते. संस्थेचे संस्थापक सद्गुरु जोग महाराज हे रामकृष्ण परमहंस, तर ह.भ.प. सोनोपंत दांडेकरमामा हे स्वामी विवेकानंद आहेत. ह.भ.प. दांडेकरमामा यांनी केलेल्या कार्यामुळेच आज असामान्य वारकरी ठायीठायी दिसतो आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात