Menu Close

वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्र राज्य शांती, सुपंथ आणि संस्कार यांच्या मार्गावर ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवात मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार

सत्काराच्या वेळी मध्यभागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

श्रीक्षेत्र आळंदी (पुणे) – गेल्या ८०० वर्षांपासून महाराष्ट्र हा शांती, सुपंथ आणि संस्कार यांच्या मार्गावर वारकरी संप्रदायामुळे आहे. वारकरी संप्रदायाने भागवत धर्म, मानवतेचा धर्म आणि माणसाच्या संवेदना जागृत ठेवायचे कार्य केले आहे. वर्ष १९९० मध्ये जरी आपण जागतिकीकरण अवलंबले असले, तरी १३ व्या शतकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांनी पसायदानाच्या माध्यमातून जागतिकीकरणाची भूमिका मांडली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात २७ मार्च या दिवशी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, प.पू. १००८ महामंडलेश्‍वर स्वामी विश्‍वेश्‍वरानंद गिरीजी, ह.भ.प. रामेश्‍वर शास्त्री महाराज, संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुति महाराज कुर्‍हेकर, ह.भ.प. संदीपान महाराज हसेगांवकर, ह.भ.प. रामराव महाराज ढोक, आळंदी संस्थानचे अध्यक्ष डॉ. अजित कुलकर्णी, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर आदींसह वारकरी संप्रदायातील अनेक संत, महंत आणि नगरपरिषदेचे सदस्य उपस्थित होते.

या वेळी ह.भ.प. मारुति महाराज कुर्‍हेकर आणि ह.भ.प. संदीपान महाराज हसेगांवकर यांनी मुख्यमंत्र्यांचा शाल, श्रीफळ, स्मतीचिन्ह, पुष्पगुच्छ आणि वारकरी पगडी भेट देऊन सत्कार केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी ह.भ.प. राधाकृष्ण गरड गुरुजी यांनी ईशस्तवन केले. त्यानंतर रामायणाचार्य आणि संस्थेचे विश्‍वस्त ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी संस्थेची माहिती देणारे प्रास्ताविक केले. आभारप्रदर्शन ह.भ.प. संदीपान महाराज हसेगांवकर यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

संस्थेविषयी गौरवोद्गार करतांना ते म्हणाले की,

१. श्री विठ्ठल आणि ज्ञानोबा-तुकाराम यांच्या आशीर्वादाने वारकरी संप्रदाय कार्य करतो आहे. त्यातील महत्त्वाचा वाटा शिक्षण संस्थेने उचलला आहे. ही संस्था ज्ञान देणारी आहे.

२. बाहेरच्या शिक्षणातून माणूस शिक्षण घेतो; पण ज्ञानी होत नाही. जोपर्यंत शिकलेले आचरणात येत नाही, तोपयर्र्ंत संस्कार, विवेकबुद्धी येत नाही. संस्थेच्या माध्यमातून ज्ञानी बनवण्याची वाटचाल केली जात आहे.

पिंपरी-चिंचवडचे पाप म्हणून इंद्रायणी नदी दूषित झाली ! – मुख्यमंत्री

आपल्या भाषणांत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवडचे पाप म्हणून इंद्रायणी नदी दूषित झाली आहे. पिंपरी-चिंचवड येथूनच जर नदीला शुद्ध पाणी आले, तर नदी दूषित होणार नाही. नदी निर्मळ होणे, ती सजीव ठेवणे आणि तिचा परिसर स्वच्छ होणे, यासाठी पिंपरी-चिंचवड पालिका आणि आळंदी नगरपरिषद यांनी एकत्रित प्रयत्न करतील. तसेच आळंदीच्या विकासाकरता शासन कटीबद्ध आहे. येथे येणार्‍या वारकर्‍यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसून ते मिळण्यासाठी नगरपरिषदेने शासनाकडे लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा. शासन त्यासाठी पाहिजे तेवढा निधी देईल.

विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालण्याचे कार्य वारकरी शिक्षण संस्था करेल ! – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
अण्णा हजारे म्हणाले की, विज्ञानाने अंतराळात प्रवेश केला; पण अध्यात्माने मानवाच्या अंतरंगात जायला शिकवले. विज्ञानाच्या अतिरेकी वापराने सध्या विज्ञान मानवाला विनाशाकडे घेऊन जाणारे ठरेल, अशी स्थिती आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड झाली, तर मानवाला प्रगती करणे सोपे होईल. हे कार्य वारकरी शिक्षण संस्था नक्की करेल.

संस्थेविषयी गौरवाद्गार काढतांना ते म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात होत असलेले परिवर्तन हे वारकर्‍यांमुळे होत आहे. आजच्या शिक्षण संस्थांमधून लिहिणारे-वाचणारे सिद्ध होतात; परंतु या संस्थेतून जे वारकरी सिद्ध झाले, ते परिवर्तन करणारे आहेत. सध्या प्राथमिक शिक्षणाचा दर्जा ढासळलेला असून संस्थेतून सिद्ध झालेल्या शिक्षकांना शासनाने शिक्षणाची पदवी देऊन त्यांना शाळांमध्ये कार्यरत करायला हवे. जर ते गावागावांमध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले, तर विद्यार्थी आणि संपूर्ण गाव यांच्यामध्ये पालट होईल. त्यातून राज्यात मोठे परिवर्तन होईल.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संस्थेचे साधक निवास आणि सभामंडपाचे भूमीपूजन

कार्यक्रमाच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संस्थेच्या वतीने उभारण्यात येणारे साधक निवास आणि सभामंडपाचे भूमीपूजन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणाच्या वेळी संस्थेला १ कोटी रुपयांची देणगी घोषित केली, तसेच ‘भूमीपूजन केलेल्या जागेवरील कोणतेही आरक्षण रहाणार नाही आणि वारकर्‍यांना दिलेला हा शब्द मोडला जाणार नाही’, असेही सांगितले. याचसमवेत संस्थेला अन्य कोणत्याही प्रकारचे साहाय्य लागले, तरी ते शासनाकडून देण्याची सिद्धता त्यांनी दर्शवली. शासनाने दिलेली ही देणगी ही ‘सत्पात्री’ असेल; कारण या देणगीतून कोट्यवधी नागरीकांमधून संस्कारित नागरीक सिद्ध होतील आणि त्यातून चांगला भारत घडेल. (असे किती लोकप्रतिनिधी म्हणतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

क्षणचित्र – कार्यक्रमात आळंदी संस्थानचे अध्यक्ष डॉ. कुलकर्णी यांनी संस्थानच्या वतीने वारकरी शिक्षण संस्थेला ६ लक्ष २५ सहस्र रुपयांची देणगी दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *