श्रीक्षेत्र आळंदी : स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सवाच्या निमित्ताने धर्म अन् राष्ट्र कार्य करण्यासाठी व्यापक संघटन उभे रहावे अन् जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यक्रमस्थळी भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे. यामध्ये लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी क्रांतिकारकांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारे सचित्र तक्ते लावण्यात आले आहेत, तसेच नमस्कार का आणि कसा करावा ?, वाढदिवस कसा साजरा करावा ? याची माहिती देणारे धर्मशिक्षणविषयक तक्तेही आहेत. क्रांतिकारकांची शौर्यगाथा सांगणाऱ्यां आणि धर्मशिक्षण देणाऱ्यां या प्रदर्शनाला वारकरी भाविकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत शेकडो जणांनी प्रदर्शनाला भेट देऊन समितीच्या कार्यात जोडले जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
ह.भ.प. रामराव महाराज ढोक दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना, समवेत श्री. सुनील घनवट
क्षणचित्रे
१. अनेक जणांनी क्रांतिकारकांची माहिती पुस्तक स्वरूपात उपलब्ध करून देण्याविषयी सुचवले.
२. अनेक शाळकरी मुलेही जिज्ञासेने माहिती जाणून घेत होते.
३. एका सद्गृहस्थांनी अत्यंत कृतज्ञताभावाने हात जोडून प्रदर्शन पाहिले.
४. वाघोली येथील युवकांच्या एका गटाने प्रदर्शन पाहून समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली, तसेच उत्स्फूर्तपणे घोषणाही दिल्या.
वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक भेट देण्यात आला. त्र्यंबकेश्वर येथून आलेले स्वामी विकासानंद सरस्वती यांनीही प्रदर्शनाला भेट देऊन समितीचे धर्मप्रसाराचे कार्य उत्तम असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात