१० ठेकेदार आणि १५ नगरसेवक यांच्यासह २८ जणांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट
वारंवार होणारे घोटाळे रोखण्यासाठी सरकारीकरण झालेली मंदिरे पुन्हा भक्तांच्या कह्यात द्यायला हवीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
धाराशिव : श्री तुळजाभवानीदेवीच्या वर्ष २०११ च्या यात्रा अनुदानात १ कोटी ६२ लाख रुपयांंचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी तुळजापूर नगरपरिषदेच्या तत्कालीन नगराध्यक्ष अर्चना गंगणे, तत्कालीन मुख्याधिकारी संतोष टेंगळे, लेखापाल अविनाश राऊत यांच्यावर निधी हडप केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. एकूण १० ठेकेदार आणि १५ नगरसेवक यांच्यासह २८ जणांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी आणि विशेष लेखपाल यांच्या चौकशी अहवालानंतर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
१. वर्ष २०११ मध्ये नवरात्र महोत्सवातील निधीत अपहार झाला होता. भक्तांना सेवा सुविधा देण्याच्या नावाखाली शासनाचा निधी संगनमताने लुटण्यात आला. बनावट ठेकेदार, लेटरहेड, शिक्के वापरून निधी हडप केला गेला.
२. मंडप, रोषणाई, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्तीची कामे न करता देयके लाटण्यात आली. साहाय्यक पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्याकडे तपास सोपवण्यात आला. गुन्हा प्रविष्ट होताच सर्व प्रतिष्ठित आरोपी नगरसेवक फरार झाले आहेत.
३. तुळजाभवानी मंदिर भ्रष्टाचाराचा अड्डा बनला असून या मंदिरावर जिल्हाधिकारी दर्जाचा स्वतंत्र अधिकारी नेमावा, अशी मागणी केली जात आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात