लाहोर : न्यायदानमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी व्यक्ती म्हणून सरकारी वकिलाला आदराचे स्थान असते. परंतु, पाकिस्तानमधील सरकारी वकीलाने आरोपींसमोर असा प्रस्ताव ठेवला की त्यामुळे पाकिस्तानच्या न्याय व्यवस्थेवरच टीका केली जात आहे. दोन मुस्लिमांना ठार केल्याच्या प्रकरणात ४२ ख्रिश्चन लोकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर लाहोर येथे असलेल्या दहशतवादविरोधी न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. या खटल्यातील सरकारी वकिलाने या आरोपींना हा प्रस्ताव दिला आहे. जर तुम्ही ख्रिश्चन धर्माचा त्याग करून इस्लाम स्वीकारला तर तुमची निर्दोष मुक्तता केली जाईल असे त्या वकिलाने म्हटल्याचे एक्स्पेस ट्रिब्यूनने सांगितले आहे.
योहानाबाद येथे २०१५ मध्ये रविवारच्या प्रार्थनेवेळी चर्चजवळ स्फोट घडवण्यात आला होता. त्या स्फोटानंतर जमावाने चिडून दोन तरुणांना ठार केले होते. हे दोघे दहशतवादी होते आणि त्यांनीच हा स्फोट घडवून आणल्याचे ख्रिश्चन समुदायाचे म्हणणे आहे. मानवी हक्क कार्यकर्ते जोसेफ फ्रॅंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी वकील सय्यद अनीस शाह यांनी हा प्रस्ताव ठेवला आहे. ते आरोपी इस्लाम स्वीकारू शकतात का असा प्रश्न त्यांनी मला विचारला असे फ्रॅंकी यांनी सांगितले.
जर ते इस्लाम स्वीकारू शकत असतील तर ते निर्दोष सुटतील असे सय्यद यांनी म्हटले. यातील एका आरोपीने असे म्हटले की, धर्म बदलण्यापेक्षा आम्ही मृत्यू पत्करू. या खटल्यातील आणखी एक वकील नसीब अंजुम यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सय्यद यांची ही जुनी सवय असल्याचेही ते म्हणाले. याआधी देखील सहा जणांना त्यांनी हा प्रस्ताव दिला असल्याचे अंजुम म्हणाले परंतु त्याकडे आम्ही नेहमीच दुर्लक्ष केल्याचे ते म्हणाले. सरकारने सय्यद यांच्यासारख्या वकिलांवर कारवाई करावी असे देखील ते म्हणाले.
संदर्भ : लोकसत्ता