श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन संघटनेसमवेतच्या बैठकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आदेश
अशी अवैध बांधकामे शासनाने स्वतःहून पाडणे अपेक्षित आहे. हिंदूंच्या मंदिरांना अवैध ठरवून ती पाडणारे शासन धर्मांधांची अवैध बांधकामे का पाडत नाहीत ? यासाठी शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना आवाज उठवावा लागणे अपेक्षित नाही !
श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी
मुंबई : सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगड येथील अफझलखान थडग्याभोवती वनखात्याच्या भूमीवर करण्यात आलेल्या अनधिकृत १९ खोल्यांचे बांधकाम पाडण्याचा आदेश वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ३० मार्च या दिवशी वनखाते आणि सातारा जिल्हा पोलीस प्रशासन यांना दिला. विधानभवनात श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात दुपारी ३ वाजता श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन संघटनेची श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना हा आदेश दिला.या बैठकीला वन विभागाचे सचिव सर्वश्री खारगे, मुख्य वनसंरक्षक पाटील, विभागीय वनअधिकारी अंजनकर, श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि सांगली येथील माजी आमदार तथा मनसेचे नेते श्री. नितीन शिंदे, मनसेच्या महिला राज्य उपाध्यक्षा अधिवक्त्या सौ. स्वाती शिंदे, हिंदू एकता आंदोलनाचे संस्थापक श्री. नारायणराव कदम, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ हजारे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आेंकार कानडे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रोहित पाटील, आदित्य पटवर्धन, चेतन भोसले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी हा धाडसी निर्णय घेतल्याविषयी श्री. नितीन शिंदे यांनी समस्त शिवप्रेमी आणि श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन संघटना यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले.
बैठकीत चर्चा करतांना श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘अफझलखान कबर परिसरातील वनखात्याच्या भूमीवर केलेले अनधिकृत बांधकाम त्वरित हटवण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शासनाला २ वेळा दिला आहे. तरीही शासनाने अनधिकृत बांधकाम हटवले नव्हते. यापूर्वीच्या शासनाने याविषयी काहीच कृती केलेली नाही. (न्यायालयाच्या आदेशानंतरही कृती न करणार्या आतापर्यंतच्या शासनांतील उत्तरदायींवर कठोर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याची नोंद घेऊन श्री. मुनगंटीवार यांनी हे अनधिकृत बांधकाम त्वरित हटवावे.’’
श्री. शिंदे यांनी श्री. सुधीर मुनगंटीवार यांना अवैध बांधकामांची छायाचित्रेही दाखवली. त्यानंतर श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वन खात्याच्या मालकीच्या भूमीवर अनधिकृत १९ खोल्यांचे बांधकाम हटवण्यात येईल; मात्र वनखात्याची भूमी सोडून अन्य ठिकाणी असलेले बांधकाम आम्हाला पाडता येणार नाही.
अफझलखानाचा वध केल्याचा इतिहास शासनाने मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांत प्रतापगडाच्या पायथ्याशी फलकावर लिहावा ! – माजी आमदार नितीन शिंदे
पत्रकारांशी बोलतांना श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘गेल्या २० ते २५ वर्षांच्या काळात काही लोकांनी अफझलखानाच्या नावे ट्रस्ट स्थापन करून अफझलखान कबरीच्या सभोवती दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम केले होते. याच मंडळींनी अफझलखानाचे जाणीवपूर्वक उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकाराच्या विरोधात वर्ष २००१ पासून श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून चळवळ उभी केली आहे. याचवर्षी विधान परिषदेतही आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधून घेतले होते. तरीही यापूर्वीच्या शासनाने हे बांधकाम पाडले नव्हते.
प्रतापगडावरील अवैध १९ खोल्यांचे बांधकाम पाडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्याचा पाठपुरावा करत आज वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे ही कबर पाडण्याला मुसलमानांचा विरोध नाही. येथे विनाकारण १४ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदोबस्ताच्या वेळी साप चावल्याने १४ पैकी २ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तरीही शासन बंदोबस्त हटवत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या अफझलखानाच्या वधाचे भव्य शिल्प शासनाने प्रतापगडाच्या पायथ्याशी उभे करावे, त्या परिसराचे नामकरण ‘शिवप्रतापभूमी’ असे करून ही भूमी जनतेला पहाण्यासाठी खुली करावी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध केल्याचा इतिहास मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांत तेथे फलकावर लिहावा.’’
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर !
माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी सांगली येथील भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर श्री. गाडगीळ यांच्या उपस्थितीत श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन संघटनेच्या वतीने वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात