Menu Close

नववर्ष स्वागताच्या निमित्ताने महाराष्ट्रात हिंदूसंघटनाचा आविष्कार

हिंदु नववर्षानिमित्त विविध ठिकाणी गुढीपूजन आणि स्वागतफेर्‍या !

मुंबई

देवनार

येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने काढलेल्या शोभायात्रेमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात प्रबोधनात्मक हस्तफलक घेऊन सहभाग घेतला. शोभायात्रेच्या समारोपानंतर समितीचे श्री. किशोर औटी यांनी ध्वनीक्षेपकावरून उपस्थितांना गुढीपाडव्याचे शास्त्र सांगितले. तसेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने सामाजिक संकेतस्थळांवरून केल्या जाणार्‍या अपप्रचाराला बळी न पडता धर्मशिक्षण घेऊन हिंदू सणांमागील शास्त्र समजून घेण्याचे आवाहन केले.

घाटकोपर

येथे एका सोसायटीमध्ये समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या व्याख्यानाच्या वेळी समितीचे श्री. सागर चोपदार यांनी उपस्थितांना गुढीपाडव्याचे महत्त्व समजावून सांगितले. या वेळी त्यांनी ख्रिस्ती नववर्षारंभ आणि आणि हिंदु कालगणनेनुसार गुढीपाडवा यांमधील भेद स्पष्ट करून सांगितला. ५५ जणांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.

भांडुप

येथे श्री सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या हळदी-कुंकू समारंभाच्या वेळी समितीच्या वतीने ‘गुढीपाडवा’ विषयावर व्याख्यान घेण्यात आले. समितीच्या

सौ. प्राजक्ता सावंत यांनी हिंदु धर्म आणि सण यांचे महत्त्व सांगितले. इंग्रजी कालगणनेनुसार नववर्षारंभ साजरा करणे कसे चुकीचे आहे, याविषयीही उपस्थितांचे प्रबोधन केले.

रायगड

रसायनी

आमदार श्री. मनोहर भोईर प्रदर्शन पहातांना

येथील कसळखंड गावामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवगर्जना प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी समितीच्या वतीने क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेनेचे आमदार श्री. मनोहर भोईर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. मनोगत व्यक्त करतांना श्री. मनोहर भोईर म्हणाले, ‘‘समिती आणि सनातन संस्था धर्मजागृतीचे करत असलेले कार्य स्तुत्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज मोगलांविरुद्ध युद्ध करून विजयी झाले; म्हणून आपण आज आनंदाने जगत आहोत. शिवरायांच्या कार्याचे मोल नाही; म्हणून प्रत्येक घराघरात त्यांची प्रतिमा असायला हवी. समितीने प्रदर्शन लावल्याविषयी मी त्यांचे आभार मानतो.’’

क्षणचित्र : सनातन प्रभातचे वाचक श्री. उदय घरत, तसेच मंडळातील कार्यकर्ते श्री. अरुण पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी प्रदर्शन लावण्यात साहाय्य केले.

कळंंबोली

आमदार श्री. प्रशांत ठाकूर (१) यांचे औक्षण करतांना कार्यकर्ती

येथे नववर्ष स्वागत समितीच्या वतीने सामूहिक गुढीचे सनातनचे साधक दांपत्य श्री. आणि सौ. मांढरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सायंकाळी स्वागतफेरी काढण्यात आली. त्यात रणरागिणी शाखा आणि प्रथमोपचार पथक सहभागी झाले होते. रणरागिणी शाखेच्या माध्यमातून स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या वेळी भाजपचे आमदार श्री. प्रशांत ठाकूर आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख श्री. बबन पाटील यांचे रणरागिणी शाखेच्या वतीने औक्षण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. स्वागत फेरीत २ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते.

स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके पाहून शिवसेनेचे कार्यकर्ते श्री. कृष्ण कदम म्हणाले, ‘‘समाजात याची पुष्कळ आवश्यकता आहे. व्यासपिठावर प्रात्यक्षिके घेण्यासाठी आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला साहाय्य करू.’’

कामोठे

येथे भारतमातेची आरती करून स्वागतफेरीला आरंभ करण्यात आला. ३ सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांनी फेरीत सहभाग घेतला. नववर्ष स्वागत फेरी समिती आणि अन्य समविचारी संघटनांच्या वतीने या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. रणरागिणी शाखेकडून चौकाचौकात तीन ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. तसेच प्रथमोपचार पथकही सहभागी झाले होते. समारोपाच्या वेळी सौ. मोहिनी मांढरे यांनी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण काळाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘ही प्रात्यक्षिके पुनःपुन्हा दाखवा आणि महिलांना धर्माची शिकवण द्या’, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. निलेश थळे यांनी केली.

रामनाथ (अलिबाग)

नववर्ष स्वागत समितीच्या वतीने श्री आणि सौ. पळणीटकर यांच्या हस्ते सामूहिकरित्या गुढीची पूजन करण्यात आले. नववर्षाच्या स्वागतफेरीत फिरत्या वाहनातून उद्घोषणेद्वारे सनातन संस्थेच्या वतीने गुढीपाडव्याचे अध्यात्मशास्त्र सांगण्यात आले. फेरीची सांगता समितीचे श्री. अजिंक्य मराठे यांनी संपूर्ण वन्दे मातरम् म्हणून केली.

पेण

येथील नववर्ष स्वागत समितीच्या आणि समविचारी संघटनांच्या वतीने सायंकाळी श्री रामेश्‍वर मंदिर, हनुमान आळी येथून शंखनादाने फेरीचा आरंभ करण्यात आला. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने स्वागत फेरी पालखीतील उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले. फेरीत १ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी पारंपरिक वेशभूषेत आणि उत्साहाने सहभागी झाले होते.

रोहा

येथे स्फूर्ती प्रतिष्ठान आणि समविचारी संघटना यांच्या वतीने नववर्ष स्वागत फेरीचे आयोजन करण्यात आले होते राम मारुती चौकातून फेरीस आरंभ करण्यात आला. या वेळी लेझीम पथक, तसेच मर्दानी खेळांची प्रत्यक्षिकेही करण्यात आली. फेरीमध्ये १५० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते.

थेरगाव

येथील डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून थेरगाव येथील बापूजीबुवा मंदिरापर्यंत फेरी काढण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. सामूहिक शिववंदना करून शोभायात्रेचा प्रारंभ झाला. प्रभु श्रीराम, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या रूपात लहान मुले सहभागी झाली होती. यामध्ये एक महिलांचे भजनी मंडळही सहभागी झाले होते.

काही ठिकाणी नागरिकांकडून धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी लाठी काठी, दांडपट्टा आदी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली. श्री गणेश आणि प्रभु श्रीराम यांची आरती अन् सामूहिक शिववंदना करण्यात आली. शिववंदना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे कार्यकर्ते या प्रसंगी सहभागी झाले होते.

सांगली

गुढीपाडव्याच्या दिवशी मिरज आणि सांगली शहरांत मोठ्या उत्साहात स्वागत फेर्‍या काढण्यात आल्या. मिरज शहरात नववर्ष स्वागत समितीच्या वतीने दत्त मंदिर ते ब्राह्मणपुरी येथील वेणास्वामी मठ या मार्गाने स्वागत फेरी काढण्यात आली. फेरीच्या प्रारंभी दत्त मंदिर येथे गुढीचे पूजन करण्यात आले. यात ढोलपथक, रामाची पालखी, महापुरुषांच्या वेशभूषेत लहान मुले, पालखीसह धार्मिक ग्रंथ, इस्कॉनचे साधक, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, भाजप, शिवतीर्थ समिती पक्ष आदी सहभागी झाले होते. या वेळी भाजपचे आमदार श्री. सुरेश खाडे यांसह सर्वश्री तानाजी घार्गे, आेंकार शुक्ल, सुनील ढोबळे, विनायक माईणकर, सुधीर अवसरे, राजू शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सतीश सरवदे, महेश कावरे यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

विश्रामबाग येथे कल्पद्रुम मैदानावर आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते गुढीचे पूजन करून शोभायात्रेस प्रारंभ झाला. विश्रामबाग येथे पारंपरिक वेशभूषेसह झांजपथक, लेझीम यांचा सहभाग होता. शोभायात्रेत प्रत्येकाने भगवे फेटे परिधान केले होते. यात डॉ. विवेक कुलकर्णी, सर्वश्री आनंद कुलकर्णी, राहुल गोंदकर यांसह स्वा. सावरकर प्रतिष्ठानची शाळा, सांगली शिक्षण संस्थेच्या शाळा यांसह अन्य शाळा सहभागी झाल्या होत्या. माधवनगर येथील डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आणि तरंग बहुउदेशीय संस्था यांच्या वतीने शोभयात्रा काढण्यात आली. यांत विविध सामाजिक, तसेच महिला संघटना सहभागी झाल्या होत्या.

सोलापूर

येथे काढलेल्या शोभायात्रेतून हिंदु संस्कृतीचे दर्शनच घडले. हिंदु नववर्ष महोत्सव समितीच्या वतीने विजयी चौकात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दीपप्रज्वलन आणि गुढीचे पूजन करण्यात आले. महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, हिंदु नववर्ष महोत्सव समितीचे संस्थापक रंगनाथ बंग, अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांची प्रमुख उपस्थिती होती. शोभायात्रेत पालकमंत्री विजयकुमार देशमुख,

श्री सिद्धेश्‍वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, दंडवते महाराज, दामोदर दरगड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक राजेंद्र काटवे, पंचांगकर्ते मोहन दाते, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते.

विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून सिद्ध केलेली अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराची प्रतिकृती आकर्षक होती. रणरागिणी शाखेनेही या वेळी घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला. या वेळी शंकर, श्रीकृष्ण आणि लोकमान्य टिळक यांची वेशभूषा काही मुलांनी साकारली होती. नववर्षानिमित्त निघालेल्या शोभायात्रेत हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेचा सहभाग होता. फेरीमध्ये धर्माभिमानी महिला आणि युवती या पारंपारिक नऊवारी साड्या, फेटे घालून सहभागी झाल्या होत्या. प्रारंभी राणारागिणी शाखेचा फ्लेक्स फलक आणि प्रत्येकाच्या हातात प्रबोधन फलक आणि भगवे ध्वजही होते.

वैशिष्ट्यपूर्ण

रंगनाथ बंग नववर्ष समितीच्या महिलांनी रणरागिणी शाखेची माहिती घेतली. त्या महिलांनी सांगितले की, रणरागिणी शाखेचे नाव ऐकले असून कार्य चांगले आहे. या वेळी त्यांना रणरागिणी शाखेच्या वतीने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात चालू असलेल्या कार्याची  माहिती देण्यात आली.

मिरज येथील फेरीत हिंदु जनजागृती समिती सहभागी झाली होती. यातील विशेष घटना म्हणजे लहान मुलांनी समितीचा फलक उत्स्फूर्तपणे मागितला आणि तो हातात धरून मुले फेरीत सहभागी झाली होती. मिरज येथील फेरीत लहान मुलांची उपस्थिती लक्षणीय होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *