क्वालालंपूर : मलेशियामध्ये इस्लामिक स्टेट (इसिस) ही जागतिक दहशतवादी संघटना हल्ला घडविण्याची “अत्यंत गंभीर भीती‘ असल्याचे मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी म्हटले आहे.
इसिसच्या दहशतवाद्यांना अटक केल्यामुळे इसिसशी संलग्न असलेल्या प्रादेशिक दहशतवादी संघटनेकडून मलेशियात दहशतवादी हल्ला घडविण्याचा इशारा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका चित्रीकरणाच्या (व्हिडिओ) माध्यमामधून देण्यात आला आहे. मलेशियामध्ये सक्रिय असलेल्या कातिबाह नुसनतारा या गटाने दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मलेशियाधील सुरक्षा दल अत्यंत सतर्क झाले आहे.
मलेशियात गेल्या काही दिवसांत इसिसविरोधात मोठी मोहिम हाती घेण्यात आली असून काही दहशतवाद्यांना पकडण्यात सुरक्षा दलास यश आले आहे. मात्र या मोहिमेचे “धोकादायक पडसाद‘ उमटण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने मलेशियामधी सुरक्षा व्यवस्थेवर दबाव आहे. इसिसच्या प्रचारास सकारात्मक प्रतिसाद देऊन या भागामधील वेगवेगळ्या देशांमधील तरुणही पश्चिम आशियात इसिससाठी लढावयास जात असल्याचे पुरेसे स्पष्ट झाले आहे. किंबहुना इसिसकडून या भागास दहशतवाद्यांच्या भरतीसंदर्भात विशेषरुपाने लक्ष्य करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले असून या पार्श्वभूमीवर इसिसविरोधातील धोरणासंदर्भातील अनेक आव्हाने या भागामधील देशांसमोर उभी राहिली आहेत.
गेल्या सुमारे वर्षभरापेक्षा अधिक काळापासून इंडोनेशिया, फिलीपीन्स, मलेशिया आणि सिंगापूर या देशांमधून शेकडो तरुण इसिसमध्ये भरती होण्यासाठी गेले आहेत. यामुळे मलेशियासहितच एकंदर दक्षिण पूर्व आशियाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनामधूनच ही अत्यंत गंभीर बाब असून या प्रकरणाच्या झळा या भागास जाणविण्यास सुरुवात झाली आहे.
संदर्भ : सकाळ