धर्मांधांवर कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश
पाकमधील हिंदूंच्या मंदिरांच्या या दैनावस्थेकडे हिंदूंच्या मतांवर निवडून आलेले भारत सरकार लक्ष देईल का ? जिहादी पाकच्या या कुकृत्यांना आळा बसवण्यासाठी आता हिंदूंनीच भारत सरकारवर दबाव आणायला हवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कराची (पाकिस्तान) : येथील सुजावल जिल्ह्यातील शिवालो (शिव) मंदिरावर अतिक्रमण करून हिंंदूंना पूजाविधी करण्यास मज्जाव केल्याविषयी ३ धर्मांधांच्या विरोधात अश्वर कुमार यांनी सिंध उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर न्या. नदीम अख्तर यांच्या खंडपिठाने तेथील उपायुक्तांना मंंदिराला संरक्षण पुरवून या ३ धर्मांधांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले, असे वृत्त ‘स्ट्रगल फॉर हिंदू एक्झिस्टन्स’ या संकेतस्थळाने दिले आहे.
शिवालो मंदिर हे ‘युनियन कौन्सिल चौहार जमाली’ येथे असून सत्तार, पप्पू आणि मालो या ३ धर्मांधांनी अवैधरित्या मंदिराचा परिसर कह्यात घेऊन तेथे धार्मिक विधी करण्यास हिंदूंना मज्जाव केला. याविषयी शाहबंदरचे मुख्तियार, वरिष्ठ गृह अधिकारी आणि अन्य अधिकारी यांच्यासमवेत अश्वर कुमार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती; मात्र याप्रकरणी कुठलीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे अश्वर कुमार यांनी सिंध उच्च न्यायालयात धाव घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी अधिकार्यांना सूचना द्यावी आणि धार्मिक विधी करण्यासाठी हिंदूंना मुक्त प्रवेश मिळावा, अशी मागणी केली. पाकिस्तानमधील हिंदूंची मंदिरे आणि त्यांच्या मालमत्तेवर इस्लामी भू-माफियांनी अतिक्रमण केल्यास सिंध उच्च न्यायालय त्या प्रकरणात पुढाकार घेऊन मंदिरांना संरक्षण पुरवते.
या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीच्या वेळी शाहबंदरचे मुख्तियार अब्दुल रशिद आणि वरिष्ठ गृह अधिकारी मुश्ताक अहमद यांना न्यायालयाने बोलवून त्यांच्याकडे विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी याचिकाकर्ते अश्वर कुमार आणि मंदिर दोहोंना सुरक्षा पुरवणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ एप्रिल या दिवशी होणार आहे.
पाकमधील हिंदू आणि सिंध उच्च न्यायालय यांच्या प्रयत्नांनंतरही पाकमधील मंदिरांची संख्या अर्ध्यावर पोचली !
‘पाकिस्तान हिंदू कौन्सिल’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार वर्ष २००७ मध्ये पाकच्या सिंध प्रांतात हिंदूंची ६४४ मंदिरे होती; मात्र चालू वर्षात (वर्ष २०१७ मध्ये) तेथील मंदिरांची संख्या न्यून होऊन ३५८ झाली आहे. अर्थात् केवळ १० वर्षांमध्ये येथील साधारण ३०० मंदिरे पाडली गेली अथवा अतिक्रमित झाली, तेथे ‘शॉपिंग मॉल’, सरकारी रस्ते, बसस्थानक उभी राहिली किंवा मुसलमानांच्या खाजगी जागांमध्ये त्यांचे परिवर्तन झाले.
मुख्यत्वे सुजावल जिल्ह्यातील सिंध प्रांतात वर्ष २००७ मध्ये १८ मंदिरे होती. वर्ष २०१७ मध्ये मंदिरांची संख्या ९ वर आली आहे. वर्ष २०१४ मध्ये येथील हिंदूंनी केलेल्या प्रखर विरोधामुळे पुलाच्या बांधकामासाठी १५० वर्षे जुने रत्नेश्वर महादेवाचे मंदिर पाडण्यापासून बचावले होते. पाकमधील हिंदू आणि न्यायालय यांच्या अथक प्रयत्नांनंतरही येथील मंदिरांची संख्या दिवसेंदिवस न्यून होत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात