देवस्थानांतील वाढता भ्रष्टाचार थांबण्यासाठी सर्व मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे आवश्यक आहे; कारण देवस्थानांचा कारभार भक्तांपेक्षा चांगल्या प्रकारे आणखी कोणीतरी पाहू शकेल का ? हिंदु राष्ट्रात मंदिरांचा कारभार भक्तांकडे सुपुर्द करण्यात येईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : शनिशिंगणापूर देवस्थानात कोट्यवधी रुपयांचा अपव्यवहार झाल्याने विश्वस्त समिती विसर्जित (बरखास्त) करून देवस्थानावर प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी १ एप्रिलला विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडतांना केली. त्यांच्यासह शिवाजीराव कर्डिले यांनी ही लक्षवेधी मांडली होती. त्यावर ‘नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानात वर्ष १९६३ पासून झालेल्या विविध कामांतील अपव्यवहाराच्या प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाच्या अधिकार्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल. आवश्यकता असल्यास देवस्थानावर प्रशासक नेमण्यात येईल’, असे आश्वासन गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिले. या चर्चेत भाग घेतांना डॉ. संजय कुटे, शरद सोनावणे, सुभाष साबणे, जयप्रकाश मुंदडा या आमदारांनी अनेक प्रश्न विचारलेे.
शनिशिंगणापूर देवस्थानातील अपव्यवहाराविषयी माहिती देतांना बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की,
१. शनिशिंगणापूर देवस्थानात वर्ष १९६३ पासून विश्वस्त नियुक्त करण्यात आल्यानंतर देवस्थानात सध्या ३२५ अधिकारी आणि १५० कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात कामावर आहेत. देवस्थानातील कर्मचार्यांच्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात अपव्यवहार झाला आहे.
२. मुळा शिक्षण संस्थेस या देवस्थानाकडून विनाकारण १ कोटी रुपयांची देणगी देण्यात आली विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष या संस्थेत ग्रंथपाल म्हणून कार्यरत असल्याने असे अनधिकृत कृत्य करूनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.
३. पानस नाला सुशोभीकरण करण्याचा आराखडा २० कोटी ५१ लक्ष रुपयांचा असतांना तो ५० कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे.
४. पंढरपूर येथील देवस्थानाच्या मालकीची इमारत व्यावसायिक तत्त्वावर देऊन लग्न आणि इतर समारंभ यांचे काम मर्जीतील व्यक्तीकडे सोपवले आहे.
५. दुष्काळनिधीच्या नावाखाली सुमारे ६ कोटी ७६ लक्ष रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. दानपेट्यांमधील रक्कम प्रतिदिन अधिकोषात भरणा केलेली नाही.
६. देवस्थानाच्या मालकीच्या दवाखान्यातील औषधे आणि इतर साहित्य, तसेच प्रसाद यांची निविदा प्रक्रिया संशयास्पद आहे. त्यांची अनेक वेळा मागणी करण्यात येऊनही चौकशी न केल्यामुळे नागरिक आणि भाविक यांच्यात असंतोष पसरला आहे.
७. देवस्थानात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप आहे. हे राजकीय नेतेच देवस्थानात अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करत असतात. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी संयुक्त समिती नियुक्त करावी.
विधानसभेत काही आमदारांनी ‘जनतेच्या भावना पोहोचवण्यासाठी समितीवर ५० टक्के लोकप्रतिनिधींची, तसेच सनदी (आयपीएस्) अधिकार्यांची नियुक्ती करावी, तीर्थक्षेत्री असणार्या अशा सर्व देवस्थानांतील अपव्यवहार रोखण्यासाठी विश्वस्तांचे दायित्व निश्चित करावे’, अशी मागणी या वेळी केली. ‘या सूचनांचा विचार केला जाईल. शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळ्याविषयी सदस्यांच्या तक्रारी असतील, तर त्यानुसार निश्चित चौकशी केली जाईल’, असे रणजीत पाटील यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात