राज्यात स्वपक्षाचे शासन असतांना अशी मागणी करावी लागणे कितपत योग्य ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
रायगड : महाराष्ट्र शासनाने मुंबईतील जिना हाऊस पाडावे. शासन जर ते पाडण्यास असमर्थ ठरले, तर बाबरी मशिदीप्रमाणे आम्ही ते उद्ध्वस्त करू, अशी चेतावणी विश्व हिंदु परिषदेचे मुख्य प्रवक्ता प्रा. सुरेंद्रकुमार जैन यांनी दिली. परिषदेच्या वतीने रामनाथ (अलिबाग) येथे प्रा. जैन यांची २ एप्रिलला सभा आयोजित केली होती. त्या सभेपूर्वी कमळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी परिषदेचे रायगड आणि गोवा संघटन मंत्री सर्वश्री सुरेश गोखले, रामनाथ प्रखंड अध्यक्ष चेतन पटेल, प्रखंड सचिव अधिवक्ता श्रीराम ठोसर आदी उपस्थित होते.
प्रा. सुरेंद्र कुमार जैन म्हणाले की,
१. बाबर हा परकीय आक्रमक असल्याने त्याचे नाव असलेली कुठलीही वास्तू या देशात असता कामा नये.
२. जिना यांनी या देशाचे तुकडे केले. येथील हिंदु महिलांवर अत्याचार केले आणि हिंदूंच्या हत्या केल्या. त्यामुळे त्यांच्याही नावाची कोणतीही प्रतिके या देशात असता कामा नये.
३. अयोध्येत राममंदिर आहे; मात्र ते शासनाच्या कह्यात असून त्यांनी ते हिंदु समाजाच्या अधीन करावे. तेथे भव्य राम मंदिर उभारले जावे, अशी हिंदूंची इच्छा आहे.
४. जोपर्यंत अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले जात नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि कुणाला स्वस्थ बसू देणार नाही.
५. देशातील मुसलमानांनी बाबरशी असलेले नाते तोडून रामाशी स्वतःचे नाते जोडावे आणि भव्य राममंदिर उभारण्यात सहकार्य करावे.
६. देशातील मुसलमान नेत्यांना राममंदिराचा प्रश्न सोडवायचा नसून त्यांना तो प्रलंबित ठेवायचा आहे. केंद्र आणि उत्तरप्रदेश येथे राम भक्तांचे शासन असून त्यांना अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठीच निवडून दिले आहे. मोदी आणि योगी आपला रंग नक्की दाखवतील आणि तो रंग भगवाच असेल.
७. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणालाही कळू न देता ‘सर्जिकल स्ट्राइक’ केले होते. त्याप्रमाणे राममंदिर निर्माण करण्यासाठीचा कायद्याचे विधेयक ते लवकरच संसदेत मांडून सर्वांना आश्चर्यांचा धक्का देतील.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात