ख्रिस्तीही त्यांच्या चर्चमध्ये अशा प्रकारचे ड्रेस कोड बनवत असतील, तर हिंदूंनी मंदिरांसाठी ते बनवले तर चुकीचे कसे ठरते ?प्रसारमाध्यमे चर्चमधील ‘ड्रेस कोड’वर चर्चासत्र आयोजित करतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
इडुकी (केरळ) : येथील चर्चमध्ये तोकडे स्कर्ट घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. चर्चमधील मार मॅथ्यू नावाच्या पाद्य्राने हा आदेश दिला आहे. यासाठी त्यांनी थेट व्हॅटिकन सिटीतील नियमाचा आधार घेतला आहे. मार मॅथ्यू यांनी पत्रक प्रसिद्ध करून हा आदेश दिला आहे.
१. ज्या महिला चर्चमध्ये जाण्यासाठी किंवा इतर धार्मिक कार्यासाठी विशेष कपडे परिधान करतात त्यांनीही तोकडे स्कर्ट परिधान करू नयेत, अशी सूचना पाद्री मॅथ्यू यांनी दिली आहे. व्हॅटिकन सिटीमध्येही महिलांसाठी ‘ड्रेस कोड’ आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या कारणास्तवच पाद्य्राने हे निर्देश दिल्याचा दावा सायरो मलाबार चर्चच्या प्रवक्त्याने केला आहे.
२. या पत्रकात पुढे म्हटले आहे की, चर्चचा मान राखण्याची आणि चर्च प्रशासनाचे म्हणणे ऐकण्याची शिकवण मुलांना लहानपणापासूनच द्या. गरोदर मातांनी चर्चच्या प्रार्थनेमध्ये भाग घ्यायलाच हवा. ‘मुलांचा जन्म झाल्यानंतर त्यांना ८ दिवसांतच दीक्षा द्यायला हवी. मुलाच्या दीक्षेचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्याच्या नावाखाली महिनोन् महिने वेळ काढू नका’, असेही त्यांनी पालकांना या पत्रकातून बजावले आहे.
३. याव्यतिरिक्त पालक आणि मुले यांनी फेसबूक, व्हॉट्स अॅप आदी सामाजिक माध्यमांचा वापर मर्यादित ठेवण्याची सूचनाही या पत्रकात करण्यात आली आहे. तसेच मुलांना भौतिक सुखाच्या मागे धावण्यासाठी प्रेरित करू नका, असा सल्लाही देण्यात आला आहे. अनेक ख्रिस्ती तरुण पवित्रता नसणारे लिव्ह इनचा पर्याय निवडत असल्याने त्यांच्यात विश्वासाची भावना अल्प होत आहे.
४. मुलांची नावे ठेवतांना ती ख्रिस्ती पद्धतीतीच असावी, असेही म्हटले आहे.
५. लहान मुलांसमोर पाद्री आणि नन यांना दोष देऊ नका. त्यामुळे मुलांवर परिणाम होऊ शकतो, असेही नमूद करण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात