शाळा-कॉलेज टार्गेट ; इसिसचा धोका
मुंबई : मुंबई-महाराष्ट्रासह देशभरातील शाळा-कॉलेज इसिसच्या टार्गेटवर असून यासाठी मुस्लिम विद्यार्थ्यांचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी व्हॉटस्अॅप आणि फेसबुकवर अधिक ऑनलाइन असल्याने याच सोशल मीडियाचा वापर त्यांना भडकविण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा आणि एटीएस तसेच एनआयएचे अधिकारी महाविद्यालयीन तरुणांवर वॉच ठेवून असल्याचे माहिती सूत्रांनी दिली.
इसिसची पाळेमुळे देशभरात खोलवर पसरली असून ती उखडून काढण्यासाठी सर्वच यंत्रणांनी कंबर कसली आहे. इतर संवेदनशील ठिकाणांसह शाळा आणि कॉलेजही इसिसच्या टार्गेटवर असल्याचे तपासातून पुढे आले आहे. शाळा आणि महाविद्यालयातील तरुणांमध्ये फेसबुक, व्हॉटस्अॅप अशा सोशल मीडियाचे क्रेझ अधिक आहे. या माध्यमातून त्यांची माथी भडकविण्याचे काम इसिसचे दहशतवादी करीत आहेत. शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेश करताना त्यांचे केवळ ओळखपत्रच तपासले जाते. बॅग तसेच इतर वस्तूंची तपासणी केली जात नाही. याचाच फायदा इसिसचे दहशतवादी घेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
ऑफलाइन भरवसा झाल्यावरच ऑनलाइन चॅटरूममध्ये प्रवेश
ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे तरुणांची माथी भडविण्याचे काम इसिसचे दहशतवादी करीत असल्याचे तपासातून उघड झाले आहे. मालवणी येथील अय्याझ आणि मुंब्रा येथील मुदत्बीर यांना ऑनलाइन जाळ्यात अडकविल्यानंतर या दोघांकडे तरुणांना वैयक्तिक भेटून इस्लामसाठी काम करण्यासाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानुसार या दोघांनी काही तरुणांना इसिसबाबत सांगितले. दोघेही आपल्यासाठी काम करीत असल्याचा भरवसा झाल्यानंतर दोघांनाही इसिसच्या ऑनलाइन चॅटरूममध्ये प्रवेश देण्यात आला. या चॅटरूममध्ये सर्व संदेशाची देवाणघेवाण कोड भाषेत केली जाते आणि सदस्यांना ही कोड भाषा शिकवली जाते.
मुस्लिम मंडळांना स्पॉन्सरशिप
मुस्लिमांमध्ये त्यांचे सण साजरी करणारी मंडळे, ग्रुप आहेत. या मंडळाच्या किंवा ग्रुपच्या म्होरक्यांना पकडून त्यांना कार्यक्रमासाठी स्पॉन्सरशिपचे लालूच दिली जाते. त्याच्या माध्यमातून ग्रुपमधील सदस्यांनादेखील आपल्याकडे करण्याचा प्रयत्न इसिसचे दहशतवादी करीत असल्याचेही एका अधिकार्याने सांगितले. त्यामुळे मंडळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलिसांची नजर आहे.
संदर्भ : सामना