कागल : तालुक्यातील कसबा सांगाव येथील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हुतात्मा भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या बलीदानाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी विद्यार्थ्यांना ‘क्रांतीकारकांचे स्मरण’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी भारताचा गौरवशाली इतिहास, पराक्रमी राजे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीकारकांनी केलेले बलीदान आणि सध्याची स्थिती या संदर्भात विद्यार्थ्यांना अवगत करण्यात आले. या वेळी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांसह १५० हून अधिक जण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या स्थळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या क्रांतिकारकांच्या प्रदर्शनाला पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन आणि क्रांतिवीर हुतात्मा भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. त्यानंतर श्री. दुसे, हिंदु जनजागृती समितीचे प्रीतम पवार आणि शाळेचे अध्यक्ष श्री. शिंगारे गुरुजी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांतील पारितोषिक वितरण करण्यात आले.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमानंतर विद्यार्थी आणि शिक्षक यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली.
२. कार्यक्रमानंतर शाळेचे अध्यक्ष श्री. शिंगारे गुरुजी यांनी ‘कार्यक्रम आणि मार्गदर्शन स्फूर्तीदायी आहे. अशा मार्गदर्शनाची आज विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे. वर्षातून २-३ वेळा अशा प्रकारचे मार्गदर्शन शाळेत ठेवूया’, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात