सातारा : प्रतापगडावरील अफझलखान मेमोरिअल ट्रस्टने बांधलेल्या १९ खोल्यांचे बांधकाम पाडण्यात येईल, असे आश्वापसन वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवर यांनी आमच्या शिष्टमंडळासमवेत झालेल्या चर्चेत दिले होते. उर्वरित बांधकाम हे महसूल खात्याच्या कक्षेत येते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे खोल्या सोडून अवैध दर्गा, तसेच अन्य बांधकाम हे अवैध असल्याने ते महसूल खात्याने तात्काळ पाडावे अशी मागणी माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी केली. ते सातारा येथील शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी शिवभक्त श्री. राजेंद्र शेडगे, शिवसेनेचे अधिवक्ता शिरीष दिवाकर, शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. विशाल साळुंखे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हणमंत कदम, श्री. आनंद सावर्डेकर, श्री. रोहित घुबडे-पाटील आणि श्री. प्रशांत कदम उपस्थित होते.
या वेळी बोलतांना श्री. हणमंत कदम म्हणाले, ‘‘उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतापगडावरील अवैध बांधकाम तात्काळ पाडले गेले पाहिजे. किती दिवस अजून शिवभक्तांना न्याय मिळणार नाही ?’’
श्री. नितीन शिंदे म्हणाले…
१. प्रतापगडाचे सुशोभीकरण करण्यासाठी शासनाने १०० कोटी रुपये दिले पाहिजेत.
२. अवैध असलेल्या १९ खोल्यांचे बांधकाम न पाडता त्याचे संग्रहालय करा, अशी मागणी काही जण करत आहेत; मात्र याला आमचा तीव्र विरोध असून हे बांधकाम पाडलेच पाहिजे.
३. अवैध बांधकामाच्या संरक्षणासाठी १४ पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यातील दोन पोलिसांचा साप चावून मृत्यू झाला. या पोलिसांचा वापर अवैध कामाचे संरक्षण करण्याऐवजी जनतेचे संरक्षण करण्यासाठी व्हावा, अशी आमची मागणी आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात