हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेला प्रबोधनानंतर मिळालेले यश !
म्हापसा : मजलवाडा, हणजुणे येथील ‘मरनेड्स बूटीक’ दुकानाच्या विदेशी महिला मालकिणीने हिंदूंसाठी आदराचे स्थान असलेल्या श्री लक्ष्मीदेवीचे अश्लील आणि विडंबनात्मक चित्र असलेले ‘टॅग’ दुकानातील कपड्यांवर लावले होते. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असून ही चित्रे तातडीने हटवावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेने सदर दुकानाच्या मालकिणीकडे केल्यावर त्यांनी दुकानातील ही सर्व चित्रे हटवली. तसेच अशा चित्रांमुळे देवतेचे विडंबन झालेे असल्यास मी देवाची क्षमा मागत असल्याचे त्या महिलेने ‘रणरागिणी’च्या कार्यकर्त्यांना सांगितले. (याउलट भारतातील आंग्लाळलेले बुद्धीवादी देवतांचे विडंबन करतात आणि ते त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर क्षमा न मागताच आपणच कसे मुक्त विचारांचे आहोत, हे दाखवून उद्धटपणे वागतात. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी ‘रणरागिणी’च्या शिष्टमडळामध्ये सौ. राजश्री गडेकर, सौ. शुभा सावंत आणि हिंदु धर्माभिमानी श्री. रोहिदास मालवणकर यांची उपस्थिती होती.
सविस्तर वृत्त असे की, या दुकानात देवीचे अश्लील आणि विडंबनात्मक चित्र असल्याची माहिती काही हिंदु धर्माभिमान्यांनी ‘रणरागिणी’च्या महिला कार्यकर्त्यांना दिली. या चित्रामध्ये श्रीलक्ष्मीदेवीचा वरचा भाग उघडा दाखवण्यात आला होता. असे अनेक ‘टॅग’ दुकानातील विविध कपड्यांवर लावण्यात आले होते. ही माहिती मिळाल्यानंतर ‘रणरागिणी’च्या कार्यकर्त्यांनी प्रबोधनासाठी दुकानाच्या मालकीणीला संपर्क साधून भेटण्यासाठी वेळ मागितली. कामात व्यस्त असल्याने त्यांनी प्रारंभी भेटण्यास टाळाटाळ केली; मात्र ४ एप्रिलला सायंकाळी ‘रणरागिणी’च्या शिष्टमंडळाचा त्यांच्याशी संपर्क झाला. ‘रणरागिणी’च्या महिला सदस्यांनी या चित्रामुळे कशा प्रकारे देवतेचे विडंबन होते, या संदर्भात सर्व माहिती त्या विदेशी महिलेला दिली. यानंतर विषय पटल्याने विदेशी महिलेने सर्व विडंबनात्मक चित्र असलेले टॅग त्वरित दुकानातून हटवून त्या ठिकाणी दुसरे ‘टॅग’ लावले. विशेष म्हणजे देवतांचे विडंबनात्मक चित्र असलेले ‘टॅग’ लावण्यात आल्याची माहिती एका हिंदु धर्माभिमान्याला मिळाल्यानंतर त्यांनी ही गोष्ट त्वरित एका शासकीय अधिकार्याच्या नजरेस आणून दिली आणि यावर कारवाई करण्याची मागणी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात