Menu Close

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर करण्याची आवश्यकता ! – ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग बलकवडे

लाल महाल येथे ‘शिवतेज दिन’ साजरा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास कुशलपणे मांडणारे सहस्रो तरुण निर्माण व्हायला हवेत. ते देशाच्या कानाकोपर्यामत जाऊन त्यांचा इतिहास सांगतील. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे महाराष्ट्रासाठी केले, ते संपूर्ण देशासाठी करणारे तरुण निर्माण होतील. देशातील सामान्य तरुण जेव्हा देशाच्या संरक्षणासाठी उभा रहातो, तेव्हा विश्वातील कोणतीही शक्ती त्याला हरवू शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग बलकवडे यांनी केले. लाल महाल उत्सव समिती आणि समस्त हिंदु आघाडी यांच्या वतीने येथील लाल महाल येथे ‘शिवतेज दिन’ ३ एप्रिल या दिवशी साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला सर्वश्री समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद एकबोटे, सार्वजनिक सभेचे अध्यक्ष विद्याधर नारगोलकर, शिवव्याख्याते सौरभ करडे, नगरसेवक विशाल धनवडे, नगरसेविका पल्लवी जावळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. प्रसाद मोरे यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पराग ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘शिववंदने’ने झाली.

‘धर्मांधांकडून काहीही विकत घेणार नाही’, असा निर्धार करा ! – सौरभ करडे

१. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळी शाहिस्तेखानावर चालून गेले, त्या वेळी मुसलमानांचे रोजे (उपवास) चालू होते. तरीदेखील महाराजांनी लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची बोटे छाटली आणि त्याला पळवून लावले. त्याउलट आज काही राजकारणी रोजाच्या वेळी टोप्या घालून ‘इफ्तार’ मेजवान्यांना (पार्टी) जातात.

२. आजही हिंदु धर्मावर अनेक संकटे चालून येत आहेत. लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा उखडणारी संभाजी ब्रिगेड असो किंवा भाग्यनगर (हैद्राबाद) येथे ओरडणारी पिलावळ असो, या आक्रमणांना रोखायला हवे. त्यांना रोखण्यासाठी एक उपाय म्हणून आपण सर्वांनी ‘कोणत्याही धर्मांधांकडून काहीही विकत घेणार नाही’, असा निर्धार करायला हवा.

‘शिवतेज’ आणि ‘हिंदुत्व शौर्य’ पुरस्काराचे वितरण

कार्यक्रमामध्ये हिंदुत्वनिष्ठांना विविध पुरस्कार देण्यात आले. येथील पर्वती भागात २ वर्षांपूर्वी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले होते. त्या परिस्थितीत हिंदु महिलांचे रक्षण करणारे धर्माभिमानी श्री. तुषार भामरे यांना ‘शिवतेज पुरस्कार’,तर मुसलमानबहुल कोंढवा परिसरातील पशूवधगृहात जाऊन गोवंशाचे रक्षण करणारे गोप्रेमी श्री. स्वप्नील धांडेकर यांना ‘हिंदुत्व शौर्य पुरस्कार’ देण्यात आला. याशिवाय गोळीबार मैदान येथे कसायाच्या हातून गोवंश सोडवणाऱ्यां तरुणांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.

क्षणचित्रे

१. डॉ. बलकवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते विविध गुण होते आणि त्यातून कसे शिकायला हवे, हे सांगितले.

२. श्री. सौरभ करडे यांनी ‘शिवतेज दिना’चा इतिहास अत्यंत प्रभावीपणे उपस्थितांसमोर मांडला. त्यांनी कविराज भूषण यांची कविता ऐकवल्यावर सर्वांनी उत्स्फूर्त घोषणा दिल्या.

शिवतेज दिनाचे महत्त्व

चैत्र शुक्ल अष्टमी या दिवशी रात्रीच्या प्रहरात लाल महालात १ लक्ष फौजेनिशी रहात असलेल्या शाहिस्तेखानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने आक्रमण केले आणि तो पलायन करत असतांना त्याची ३ बोटे छाटली. या अभूतपूर्व इतिहासाचे स्मरण करण्यासाठी त्या तिथीला ‘शिवतेज दिन’ साजरा करण्यात येतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *