महाराजा भोज उत्सव समिती आणि हिंदु जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धर्मसभा
धर्मसभेला उपस्थित सहस्रो हिंदूंचा निर्धार
यंदा १२ फेब्रुवारीला वसंत पंचमी येत असून या दिवशी शुक्रवार आहे. वसंत पंचमी हा हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असल्याने वर्षातून एकदा केवळ याच तिथीला या मंदिरात पूजन करण्याची संधी हिंदूंनी दिली जाते, तर प्रत्येक शुक्रवारी मुसलमान नागरिकांना या मंदिराच्या आवारात अवैधरित्या बांधण्यात आलेल्या कमाल मौलाना दर्ग्यात नमाजपठण करण्यास दिले जाते. शुक्रवारी येणार्या वसंत पंचमीच्या दिवशी पूर्ण दिवस लाखोंच्या संख्येत जमणार्या हिंदूंना तेथे पूजन करण्याची अनुमती देऊन मुसलमान नागरिकांना अन्यत्र नमाजपठण करण्यास द्यावे, अशी मागणी येथील हिंदू करत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने दोन्ही बाजूच्या लोकांच्या बैठका घेऊन चर्चा चालू केली आहे आणि काही सुवर्णमध्य निघतो का, ते पाहिले जात आहे. त्यासमवेतच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतील, अशांची आधीच धरपकड करण्यास पोलीस प्रशासनाने आरंभ केला आहे.
धार (मध्यप्रदेश) : संघटित झालेला हिंदु समाज जो निर्णय घेईल, तेच वसंत पंचमीला होईल. यंदा वसंत पंचमीच्या दिवशी भोजशाळेत हिंदु समाजाने पूर्ण दिवस पूजन करण्याच्या हिंदूंच्या अधिकारात कोणतीही बाधा प्रशासनाने घालू नये, अशी चेतावणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग प्रचारक श्री. विक्रमसिंह रघुवंशी यांनी दिली आहे. श्री देवी सरस्वती मंदिराच्या (भोजशाळेच्या) मुक्तीसाठी स्थापन झालेली महाराजा भोज उत्सव समिती आणि हिंदु जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने २४ जानेवारी २०१६ या दिवशी येथे धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. रघुवंशी बोलत होते. यंदाच्या वसंत पंचमीला भोजशाळेत हिंदू पूर्ण दिवस पूजन करणारच, असा निर्धार सभेला उपस्थित सहस्रो हिंदूंनी केला.
सभेचा आरंभ दीपप्रज्वलनाने झाला. जगदीशचंद्र शर्मा (बाबुजी) आणि विमल गोधा यांनी सभेचे अध्यक्षस्थान भूषवले. सभेच्या पूर्वार्धात समितीचे श्री. गोपाल शर्मा यांनी भोजशाला मुक्ती संग्रामाविषयी उपस्थितांना अवगत केले. ते म्हणाले, एक काळ असा होता की, भोजशाळेमध्ये हिंदूंना प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आली होती; पण वर्ष २००३ ला हिंदूंनी केलेल्या तीव्र संघर्षामुळे भोजशाळेमध्ये हिंदूंना प्रवेश खुला करण्यात आला. वर्ष २००६ मध्ये वसंत पंचमीच्या दिवशी हिंदूंनी पूजनही केले आणि वर्ष २०१३ ला हिंदूंच्या संघटित विरोधामुळे भोजशाळेच्या परिसरात नमाजपठणही झाले नाही.
साध्वी ऋतंभरा यांनी कॉन्फरन्सद्वारे या सभेला उपस्थित असलेल्या हिंदूंना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, मी शरिराने जरी आता तुमच्यासमवेत नसले, तरी माझा आत्मा या मुक्तीआंदोलनात तुमच्यासमवेतच असेल. जेव्हा जेव्हा हिंदु धर्मरक्षणासाठी आवश्यकता लागेल, मी तुमच्यासमवेत असेन.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात