मिरज शहरात श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने फेरी उत्साहात !
मिरज : जीवनात प्रत्येक टप्प्यावर आपल्यासाठी प्रभु श्रीरामचंद्र हे आदर्श आहेत. कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असेल, तर श्रीराम नामाचा जप हेच त्यावर उत्तर आहे. आसुरी शक्तींचा नाश करण्याचे सामर्थ्य रामरक्षेत आहे. मोक्ष हवा असला, तरीही रामनामच उपयोगी पडते. प्रतिदिन हिंदूंनी श्रीरामाचा नामजप केला पाहिजे आणि तो श्रीरामाला अर्पण केला पाहिजे. अशा श्रीरामाचे भव्य मंदिर अयोध्येत होण्याचा संकल्प प्रत्येक हिंदूने मनात बाळगला पाहिजे, असे मार्गदर्शन पू. विजय महाराज यांनी केले. श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने मिरज शहरात प्रथमच भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
शिवतीर्थापासून या फेरीचा प्रारंभ करण्यात आला. सराफ कट्टा, महाराणा प्रताप चौक, किसान चौक, मिरज हायस्कूल रोड, गोठण गल्ली येथील श्रीराम मंदिर येथे फेरीची समाप्ती झाली. श्री. दिगंबर कोरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी ही फेरी यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या फेरीत श्रीरामाचा रथ, हत्ती, घोडे, सजवलेली बैलगाडी, नगारे, सनई, श्रीरामाची पालखी तसेच पारंपरिक वेषात मोठ्या संख्येने हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. प्रारंभी पू. विजय महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. विनायक माइणकर, शिवतीर्थ उत्सव समितीचे श्री. सुधीर अवसरे, शिवसेनेचे मिरज उपतालुकाप्रमुख श्री. चंदू मैगुरे, शिवसेनेचे श्री. आेंकार जोशी, श्री. आनंद राजपूत, सर्वश्री रोहित चिवटे, आकाश कलगुटगी, धनंजय भिसे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कुमार माने आणि श्री. मनोज गवळी उपस्थित होते.
भोसले चौक येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फेरीचे स्वागत करण्यात आले. या वेळी श्रीमती डॉ. मृणालिनी भोसले, सौ. संगिता भोसले, श्रीमती मीना चव्हाण, सौ. सुप्रिया चव्हाण, सौ. चंदा खोबरे उपस्थित होत्या.
विशेष
१. फेरीच्या मार्गावर पू. विजय महाराज हे उपस्थितांकडून ‘श्रीराम जय राम जय जय राम’, हा जप करवून घेत होते त्यामुळे फेरीतील चैतन्य शेवटपर्यंत टिकून होते.
२. चौकाचौकात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे फेरीचे स्वागत केले. अशा प्रकारची फेरी मिरज शहरात प्रथमच निघाली होती आणि भाविकांनी त्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात