तेलुगु नववर्षानिमित्त आंध्रप्रदेश शासनाची विशेष योजना !
आंध्रप्रदेश शासनाचा आदर्श इतर राज्यांनीही घ्यावा !
भाग्यनगर (हैद्राबाद) : आंध्रप्रदेशच्या नायडू शासनाकडून तेलुगु नववर्ष युगादी (गुढीपाडवा) पासून नवीन योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत स्थानिक मंदिरांचे पुजारी विवाह आणि जन्मासह विशेष घटनांच्या वेळी लोकांच्या घरी जाऊन त्यांना आशीर्वाद देणार आहेत. एखाद्या कुटुंंबात निधन झाल्यास स्थानिक शिव मंदिराचे पुजारी पवित्र अभिषेक जल घेऊन संबंधित कुटुंबाकडे जातील. राज्यशासनाचे मंत्री पी. माणिक्याला राव म्हणाले, ही योजना मुख्यत्वे दलित समाजामध्ये हिंदु धर्माचा प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून सिद्ध करण्यात आली आहे. या माध्यमातून हिंदु धर्माचा प्रसार करण्यात येणार असून ही सेवा विनामूल्य असणार आहे. ते पुढे म्हणाले, या सेवेसाठी राज्यशासन कुठलेही शुल्क आकारणार नाही; मात्र लोकांना श्रद्धेने काही अर्पण करायचे असल्यास ते पुजार्यांना दक्षिणेच्या स्वरूपात धन देऊ शकतात. प्रारंभी या योजनेच्या अंतर्गत ज्या मंदिरांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा अल्प आहे, अशा मंदिरांची निवड करण्यात येणार आहे. मोठ्या मंदिरांचे पुजारी या योजनेमध्ये सहभागी होणार नाहीत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात