गेल्या ६८ वर्षांमध्ये आतापर्यंतच्या शासनांनी देशाची केलेली अधोगती ! गोवंश हत्या रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
माहितीच्या अधिकाराखाली उघड झालेले भयानक वास्तव ! महाराष्ट्रात सर्वाधिक पशूवधगृहे
नवी देहली : भारतात शाकाहारी लोकांची संख्या अधिक आहे; परंतु देशात दुधाचे कारखाने आणि प्रकल्प यांच्याहून पशूवधगृहांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. भारतात १ सहस्र ६२३ नोंदणीकृत पशूवधगृहे आहेत, तर दुधावरील प्रक्रिया करणारे केवळ २१३ नोंदणीकृत कारखाने आणि ७९३ द्रव दुधाचे प्रकल्प आहेत. माहिती अधिकराच्या अंतर्गत ही माहिती मिळवणारे रमेश वर्मा म्हणाले, देशातील मांस निर्मितीचे कारखाने दूध उत्पादनाच्या कारखान्यांपेक्षा अधिक आहेत. ही धक्कादायक गोष्ट आहे.
१. माहिती अधिकाराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पशूवधगृहांची संख्या ३१६ एवढी असून देशात सर्वाधिक आहे. (यावरून केवळ गोवंश हत्याबंदी कायदा करून काही उपयोग नाही. कायद्याची प्रभावी कार्यवाही होण्यासाठी आता जनतेलाच आवाज उठवावा लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे ! – संपादक). त्या खालोखाल उत्तरप्रदेशमध्ये २८५ आणि तमिळनाडूमध्ये १३० पशूवधगृहे आहेत.
२. भारतातील मांस उद्योगामध्ये म्हशी, बकरी, डुक्कर, बैल, कोंबडी आणि गाय यांच्या मांसाचा समावेश आहे.
३. भारतात २९ मधील २४ राज्यांमध्ये गोहत्या अणि गायींची विक्री यांच्याविषयी विभिन्न नियम आहेत.
४. केरळ, बंगाल, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय, नागालॅण्ड, त्रिपुरा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये गोहत्येवर कोणतीही बंदी नाही.
५. केरळमध्ये ५५, बंगालमध्ये ११, सिक्कीममध्ये ४ आणि मिझोराममध्ये २ पशूवधगृहे आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात