जबलपूर (मध्यप्रदेश) – आज प्रभु श्रीरामचंद्र यांच्या चरित्राचे आचरण करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा आम्ही त्याचे आचरण करू, तेव्हाच आम्ही रामराज्य आणू शकणार आहोत. आज आपल्या अधिकारापेक्षा वडिलांच्या वचनाला अधिक महत्त्व देणारा पुत्र, संपत्तीसाठी आपल्या भावाच्या विरोधात न्यायालयात न जाणारा भाऊ यांची आवश्यकता आहे. केवळ बोलण्याने रामराज्य येणार नाही, तर त्यासाठी आम्हाला प्रभु श्रीरामाच्या गुणांचे आचरण केले पाहिजे. येथील बलदेवबागमधील श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
राजकीय महत्त्वकांक्षा आणि इच्छाशक्ती यांच्या अभावी आजही श्रीराम मंदिर अपूर्ण ! – डॉ. अखिलेश गुमास्ताजी, आयोजक, वर्ल्ड रामायण कॉन्फरन्स
राजकीय महत्त्वाकांक्षा आणि इच्छाशक्ती यांच्या अभावी आतापर्यंत प्रभु श्रीरामाचे दिव्य मंदिर झाले नाही. माझ्या वडिलांनी वर्ष १९९२ मध्ये राममंदिराच्या उभारणीसाठी गोळा करण्यात आलेल्या वर्गणीमध्ये त्यांच्यासह माझ्या खिशातील सर्व पैसे दान केले होते. अयोध्येत अपवित्र ढाचा पाडतांना दोन कारसेवकांचा मृत्यू झाला, तेव्हा ते म्हणाले होते, मला दु:ख आहे की ते माझे पुत्र नाहीत. अशा अनेक पित्यांची राममंदिराची इच्छा आजही अपूर्ण आहे. त्यामुळे मी प्रत्येक क्षणी स्वत:ला धिक्कारत असतो.
गीता योगशास्त्र, तर रामचरितमानस प्रयोगशास्त्र ! – शिवराम समदडिया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
गीता योगशास्त्र, तर रामचरितमानस प्रयोगशास्त्र आहे. रामचरितमानसच्या आचरणाने मनुष्य पूर्णत्व प्राप्त करू शकतो. हिंदुद्वेष्ट्यांमुळे ज्यांना देश सोडावा लागला, ते रामायण सोबत घेऊन गेले. आज कंबोडियाच्या ग्रामीण भागांतही लोकांच्या घरी रामायण आढळून येते. मलेशियासारख्या मुसलमान राष्ट्रात श्रीरामाच्या पादुकांचे स्मरण करून शपथ घेतली जाते.
हिंदु राष्ट्रासाठी समाजाने पुढे आले पाहिजे ! – डॉ. आनंद राव, विभागप्रचारक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
विश्वमांगल्याची इच्छा केवळ हिंदु धर्म करतो. जगाला शांतीकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य केवळ भारतात आहे, असे महर्षि अरविंद यानी म्हटले होते. आज हिंदु राष्ट्रासाठी समाजाने पुढे आले पाहिजे. तरुणांवर धन नाही, तर संस्कारांचा परिणाम होणे आवश्यक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात