Menu Close

कुलभूषण जाधव यांची सुटका न झाल्यास पाकला ‘जशास तसे’ उत्तर द्या ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

दादर (मुंबई) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन

विविध फलक हातात धरून आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

मुंबई : भारत सरकारने पाकिस्तानवर दबाव निर्माण करून कुलभूषण जाधव यांची फाशी रहित करून त्यांना मुक्त करण्यास भाग पाडावे अन्यथा शांतीची कबुतरे उडवणे थांबवून ‘जशास तसे’ उत्तर द्यावे. यासाठी आजवर भारतात हेरगिरी करतांना पकडलेल्या पाकिस्तानी आरोपींना तात्काळ फाशी देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी १२ एप्रिलला हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी येथे आंदोलनाद्वारे केली. ‘पाकप्रेमी कलाकार आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी आता कुठे गेले आहेत’, असा प्रश्‍नही हिंदुत्वनिष्ठांनी या वेळी उपस्थित केला.

श्री. कुलभूषण जाधव यांना कथित हेरगिरी केल्याच्या आरोपावरून पाक लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने दादर येथील कबुतरखान्याजवळ आंदोलन करण्यात आले.

रायगड संवर्धन प्रतिष्ठानचे श्री. राजेंद्र सावंत, हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. प्रकाश सावंत, हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी आणि श्री. सुमीत सागवेकर यांनी त्यांचे विचार मांंडून नागरिकांचे प्रबोधन केले. या आंदोलनाला श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. बळवंतराव दळवी, नरेंद्र मोदी विचार मंचचे अध्यक्ष श्री. रोहित पांडे उपस्थित होते. वरील संघटनांसमवेतच स्वराज्य युवा प्रतिष्ठान; श्री शिवकार्य प्रतिष्ठान, विक्रोळी; बजरंग दल यांचे कार्यकर्ते, तसेच सनातन संस्थेचे साधक या आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलनातील मान्यवरांचे विचार

भारतियांवर सतत कुरघोडी करणार्‍या पाकला भारताने धडा शिकवावा ! – श्री. राजेंद्र सावंत, रायगड संवर्धन प्रतिष्ठान

मी स्वतः श्री. कुलभूषण जाधव यांच्या नातेवाइकांना भेटलो. तेव्हा समजले की, श्री. जाधव हे माजी नौदल सैनिक आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी इराण देशात व्यवसाय चालू केला; परंतु पाकिस्तानने गुप्तहेर असल्याच्या खोट्या आरोपाखाली त्यांना बळजोरीने अटक केली. श्री. जाधव यांना पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब आहे. श्री. जाधव यांचे कुटुंबीय चिंतेत असून त्यांना न्याय मिळण्यासाठी वेगवेगळ्या संस्था, संघटना आणि परराष्ट्र मंत्रालय येथे भेटत आहेत. अशा प्रकारे वारंवार भारतियांवर कुरघोडी करणार्‍या पाकला भारताने धडा शिकवावा !

कुलभूषण जाधव यांच्या सुटकेपर्यंत तीव्र आंदोलन करणार ! – श्री प्रकाश सावंत, हिंदुराष्ट्र सेना

श्री. कुलभूषण जाधव यांना भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि भारत सरकार यांनी त्वरित पावले उचलावीत. तोपर्यंत आम्ही तीव्र आंदोलन करत राहू.

भारताने त्वरित पावले उचलून पाकिस्तानला जेरीस आणावे ! – वैद्य उदय धुरी, मुंबई प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

पाकिस्तानात कुख्यात आतंकवादी दाऊद आणि हाफिज सईद खुशाल रहात आहेत. त्यांना पाकिस्तान कोणतीही शिक्षा करत नाही; परंतु माजी नौदल सैनिक श्री. कुलभूषण जाधव हे भारतीय असल्याने त्यांना पाकिस्तानने मुद्दामहून खोट्या आरोपाखाली अडकवले आहे. भारताने त्वरित पावले उचलून पाकिस्तानचे पाणी बंद करावे आणि कोणत्याही प्रकारे पाकिस्तानला जेरीस आणावे.

क्षणचित्र : आंदोलनात उल्हासनगरहून श्री. नरेंद्र मोदी विचारमंचाचे कल्याण शहर युवामंच अध्यक्ष श्री. रोहित पांडे सहभागी झाले होते. त्यांच्या समवेत आलेले धर्माभिमानीही उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी झाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *