हिंदु जनजागृती समितीची मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मागणी
अशी मागणी का करावी लागते ? शासनाने हे स्वतःहून करणे हिंदूंना अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : भारतामध्ये हिंदूंच्या देवतांचे मोठ्या भक्ती-भावाने पूजन केले जाते. श्री हनुमान आणि श्री गणेश या दोन्ही देवता सप्तदेवतांपैकी असून त्यांना विशेष महत्त्व आहे. इंग्रजी माध्यमांमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम हा इंग्रजांनी घालून दिलेल्या पद्धतीनुसार असल्याने त्यामध्ये श्री हनुमानाला ‘मंकी गॉड’ आणि श्री गणेशाला ‘एलिफंट गॉड’ असे संबोधण्यात आले आहे; मात्र अन्य धर्मातील ‘अल्ला’ आणि ‘जीझस’ यांची नावे आहे तशी वापरली आहेत.
हिंदूंच्या देवतांचे विडंबन करून त्यांना अशाप्रकारे संबोधणे अनाकलनीय आहे. श्री हनुमान आणि श्री गणेश यांवर भारतातील हिंदूंची श्रद्धा असल्याने या देवतांच्या नावांचा तितक्याच आदराने उल्लेख केला जावा. श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये शिकवल्या जाणार्या अभ्यासक्रमात त्वरित पालट करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात