सांगली : येथील बसस्थानक परिसरातील २० वर्षांहून अधिक जुने असलेले श्री दत्तमंदिर महापालिका प्रशासनाने १२ एप्रिल या दिवशी सकाळी ७ वाजता पोलीस बंदोबस्तात पाडून टाकले. हे मंदिर अतिक्रमित असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. औदुंबराच्या वृक्षाच्या खाली भाविकांनी या मंदिराची स्थापना केली होती. या मंदिराची पूजा परिसरातील रिक्शाचालक करत, तसेच वर्षातून दत्तजयंतीही मोठ्या प्रमाणात करत. या परिसरातील लोकांचे ते श्रद्धास्थान होते. सकाळच्या वेळेत कारवाई केल्याने लोकांना त्याची फारशी माहिती नव्हती.
हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर तात्काळ कारवाई; मात्र अन्य धर्मियांच्या अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई नाही !
काँग्रेस कमिटीजवळ असलेल्या प्रसिद्ध नागोबा देवालयाचे बांधकामही काढण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. हे मंदिर आतील जागेवर स्थलांतरित करण्यात येणार असून त्याचे कामही सध्या महापालिका प्रशासनाने थांबवले आहे. महापालिका क्षेत्रातील अनुमाने १८० अनधिकृत धार्मिक स्थळांना महापालिका प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. ही कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले; मात्र ज्या गतीने हिंदूंच्या मंदिरांवर अतिक्रमण असल्याचा बडगा उगारण्यात येत आहे, त्या प्रमाणात अन्य धर्मियांच्या कोणत्याच प्रार्थनास्थळावर बडगा उगारण्यात येत नाही. यामुळे हिंदूंमध्ये संतप्त भावना आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात