घाटाबिलोद (इंदूर, मध्यप्रदेश) : आज तरुणांना पाश्चात्त्य संस्कृतीचे आकर्षण वाटते आणि हिंदु संस्कृतीनुसार आचरणाची लाज वाटत आहे. इंग्रजांनी भारतातील गुरुकूल व्यवस्था खंडित करून जी शिक्षणपद्धती भारतात आणली, त्याचा हा परिणाम आहे. प्रत्यक्षात हिंदु संस्कृती ही शास्त्रशुद्ध असून त्याप्रमाणे आपण आचरण केल्यास त्यातून होणार्या लाभाचा अनुभव घेऊ शकतो. शेकहॅन्ड न करता नमस्कार करणे, टिळा लावणे, वाढदिवस मेणबत्त्या विझवून न करता आरती ओवाळून साजरा करणे, अशा छोट्या छोट्या धर्माचरणाच्या कृतीतून आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी येथे केले. येथील माँ शारदा शाळेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी विविध राज्यांत असलेली हिंदूंची दुःस्थिती पालटण्यासाठी संघटित होण्याच्या आवश्यकतेविषयी युवकांचे प्रबोधन करण्यात आले. समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांनी उपस्थितांच्या प्रश्नांचे शंकानिरसन केले.
धर्माचरणाचे महत्त्व समजल्यावर लगेच आचरण करण्यास प्रारंभ करणारे घाटाबिलौद येथील धर्माभिमानी !
हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाचे वाचक आणि अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी श्री. विकास पटेल यांनी त्यांच्या मित्रांना एकत्र करून या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीनंतर श्री. पटेल यांनी संपर्क करून सांगितले की, बैठकीनंतर आम्ही चर्चा केली आणि सर्व मित्रांनी ‘शेकहॅन्ड’ करणे सोडून दिले आहे. त्याऐवजी नमस्कार करण्यास प्रारंभ केला आहे. याविषयी श्री. पटेल म्हणाले की, आज केवळ घोषणा देणे, झेंडे फडकवणे म्हणजे हिंदु धर्माचे कार्यकर्ते अशी व्याख्या झाली आहे. प्रत्यक्षात हिंदु धर्म आणि धर्माचरण यांविषयी त्यांना काडीमात्र माहिती नाही. समितीच्या संकेतस्थळावरून ही माहिती मिळाल्याने आम्हाला खूप बरे वाटले
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात