मंदिर व्यवस्थापनाने काही वर्षांपूर्वीच चौथर्यावर चढून शनिदेवाला तेलार्पण करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे सध्या तेथे सर्वच जाती-धर्माचे स्त्री-पुरुष श्री शनिदेवाचे दूरवरून दर्शन घेतात. त्यामुळे तेथे केवळ स्त्रियांना बंदी आहे, असे म्हणणे अयोग्य आहे. हा विषय स्त्रीमुक्तीचा नसून पूर्णतः आध्यात्मिक स्तराचा आहे. धर्मशास्त्राचे पालन करणे हेच योग्य आहे !- संपादक, हिंदुजागृती
शनिशिंगणापूरमधील शनी चौथऱ्यावर महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आवाज बुलंद होताना दिसत असून आता हिंदू धर्माची प्रमुख संस्था असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेनेही महिलांना तेथे प्रवेश मिळण्यास कोणतीही हरकत नसावी, अशी भूमिका मांडली आहे.
आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी महिलांना कोणत्याही मंदिरात प्रवेश बंदी नाकारली जाऊ नये. ही बाब चुकीची आहे. महिला असो वा पुरूष मंदिर प्रवेशाबाबत दोघांनाही समान वागणूक मिळाली पाहिजे, असं स्पष्ट मत या वादावर बोलताना महंत गिरी यांनी नोंदवलं.
शनिशिंगणापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. त्यात पुण्यातील ‘भूमाता ब्रिगेड रणरागिणी’ या संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी बंदी झुगारून शनिचौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी काल धडक दिल्याने तणावात अधिकच भर पडली होती. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ईश्वराच्या दर्शनासाठी भेदभाव ही आमची संस्कृती नाही, असं परखड शब्दांत सांगत मंदिर प्रशासनाने पुढाकार घ्यावा व चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवावा, असा सल्ला दिला आहे.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स