अलिगड (उत्तरप्रदेश) : तलाकपीडित मुसलमान महिलांना न्याय हवा असेल, तर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारावा, असे आवाहन हिंदू महासभेच्या सचिव पूजा शकुन पांडे यांनी मुसलमान महिलांना केले आहे.
पांडे म्हणाल्या, ‘‘जर आमचे सरकार आणि आमचे कायदे तुम्हाला न्याय देऊ शकले नाहीत, तर आम्ही तुम्हाला न्याय देऊ.’’ तलाकपीडित महिलांना न्याय मिळावा, यासाठी पांडे यांनी ‘उत्थान यज्ञा’चे आयोजन केले होते. अनेक मुसलमान महिला आणि पुरुष यज्ञात सहभागी झाले. उपस्थित सर्वांनी तोंडी तलाक प्रथेविरुद्ध लढण्याची शपथ घेतली. या वेळी पांडे म्हणाल्या, ‘‘पीडित महिलांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी मी समर्पित भावनेने काम करत आहे. या सर्व पीडित महिलांचा पुनर्विवाह केला जाईल. मी स्वत: त्यांचे कन्यादान करीन.’’
हिंदू महासभेच्या अभियानावर उत्तरप्रदेश ऑल इंडिया मुस्लिम महिला पर्सनल लॉ बोर्डच्या अध्यक्षा शीरिन मसरून म्हणाल्या, ‘‘जर त्यांना (हिंदू महासभा) खरोखरच साहाय्य करावेसे वाटत असेल, तर त्यांनी पीडित महिलांंना शिक्षण द्यावे. त्यांचा आत्मविश्वास वाढवावा. त्यांच्यात स्वत:च्या पायावर उभे रहाण्याची क्षमता निर्माण करावी.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात