Menu Close

अमेरिकेच्या आक्रमणात इसिसचे ३६ आतंकवादी ठार

केरळमधील मुसलमान तरुणाचाही समावेश

आतंकवाद कसा नष्ट करायचा, हे अमेरिकेकडून भारत कधी शिकणार ? राष्ट्रासाठी धोकादायक असणार्‍या इसिसच्या तळांचा शोध घेऊन ते उद्ध्वस्त करणार्‍या अमेरिकेप्रमाणे भारतानेही पाकपुरस्कृत आतंकवाद्यांवर कृती करणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

काबूल : १३ एप्रिलच्या रात्री अमेरिकेने अफगाणिस्तानमधील अचिन जिल्ह्यात नानगरहर येथील इसिसच्या तळांवर केलेल्या महाबॉम्बच्या आक्रमणात ३६ आतंकवादी ठार झाले. यामध्ये केरळमधून इसिसमध्ये भरती झालेल्या मुर्शीद महंमद या २४ वर्षीय तरुणाचाही समावेश आहे. तो ठार झाल्याविषयी अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. या आक्रमणात इसिसचे सुमारे ७० तळ उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज आहे. या भागात इसिसचे अनेक मोठे नेते लपून बसल्याची माहिती अमेरिकेला मिळाली होती. या भागात ६०० ते ७०० आतंकवादी असल्याचा दावा अमेरिकी सैन्याने केला होता. अमेरिकेने आक्रमणासाठी सर्वांत मोठ्या बिगर अण्विक बॉम्बचा वापर केला. ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ असे या बॉम्बला संबोधले जाते.

केरळमधून २५ मुसलमान इसिसमध्ये !

केरळमधून आतापर्यंत २५ मुसलमान इसिसमध्ये भरती झाले आहेत. महंमदसह सर्व जण अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमारेषेवर नानगरहर येथे होते, अशी माहिती समोर आली होती. मुर्शीदच्या मृत्यूची बातमी अफगाणिस्तानमधील माजीद पुरयील नामक तरुणाने केरळमधील सामाजिक कार्यकर्त्याला टेलिग्रामवरून संदेश पाठवून दिली. मुर्शीद मंहमद वर्षभरापूर्वी इसिसमध्ये भरती झाला होता. तेव्हापासून त्याने केरळमध्ये त्याच्या कुटुंबियांशी कधीही संपर्क साधला नाही. त्याने अफगाणिस्तानमध्ये एका महिलेशी लग्न केले आणि तो चालक म्हणून काम करत असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली होती.

‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ म्हणजे नेमके काय ?

अमेरिकेने नानगरहर परिसरात जीबीयू-४३/बी मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट (एम्ओएबी) नावाचा बॉम्ब टाकला. या बॉम्बला ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ असेही म्हटले जाते. याचा वापर शत्रूवर मानसिक दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने केला जातो. अमेरिकेने या बॉम्बचा वापर करण्याआधी कोणत्याही देशाने या बॉम्बचा वापर केला नव्हता. त्यामुळे या बॉम्बचा वापर करणारा अमेरिका हा पहिला देश ठरला आहे. या बॉम्बच्या वापरानंतर येथे ३०० मीटरचा खड्डा पडला आहे. या बॉम्बला जाळीदार पंख असतात. बॉम्ब आकाशातून टाकण्यात आल्यानंतर हे पंख बॉम्बच्या वजनाला नियंत्रित करतात. हा बॉम्ब इतका मोठा असतो की, तो केवळ विमानाच्या माध्यमातूनच टाकला जाऊ शकतो. या बॉम्बला पॅलेटवर ठेवले जाते. यानंतर पॅराशूटच्या साहाय्याने बॉम्बला विमानाबाहेर टाकले जाते. पॅराशूटच्या साहाय्याने पॅलेटला खेचण्यात आल्यानंतर पॅलेट बॉम्बपासून वेगळे करण्यात येते आणि त्यानंतर बॉम्ब लक्ष्यावर टाकला जातो. यानंतर बॉम्ब लक्ष्याच्या दिशेने वेगाने जातो. उपग्रहाच्या माध्यमातून या बॉम्बचे नियंत्रण केले जाते.

भूमीपासून ६ फुटावर बॉम्बचा स्फोट घडवण्यात येतो. असे करण्यामागे स्फोटाची तीव्रता अधिकाधिक राखणे हा उद्देश असतो. मोठे लक्ष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आणि भूमीवरील सैन्याला, शस्त्रास्त्र साठ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जातो. या स्फोटाची तीव्रता ११ टिएन्टी बॉम्बच्या स्फोटांएवढी असते. दुसर्‍या महायुद्धात जपानच्या हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणूबॉम्बमध्ये १५ टन टिएन्टी स्फोटके होती. मदर ऑफ ऑल बॉम्ब ३० फूट लांब असतो. या बॉम्बचे वजन ९ सहस्र ५०० किलो असते. या बॉम्बचे वजन हिरोशिमामध्ये टाकण्यात आलेल्या बॉम्बपेक्षा अधिक होते.

या बॉम्बच्या स्फोटानंतर सर्व दिशांना साधारणत: एका मैलापर्यंत हानी होते; मात्र अणूबॉम्ब नसल्याने यामुळे कोणताही किरणोत्सर्ग होत नाही. या स्फोटानंतरच्या अवघ्या काही सेकंदानंतर आजुबाजूच्या भागातील ऑक्सिजन संपतो. त्यामुळे परिसरातील लोकांचा श्‍वास गुदमरतो. स्फोटाच्या आवाजानंतर एक प्रकाशाचा किरण निघतो आणि एक विध्वंसक लाट एका मैलापर्यंत जाऊन तिच्या वाटेत येणार्‍या प्रत्येक वस्तूची हानी करते. यामुळे बहुतांश लोकांचा मृत्यू होतो. अनेकांच्या कानांमधून रक्तस्राव चालू होतो. परिसरातील झाडे उन्मळून पडतात आणि इमारती कोसळतात.

रशियाकडे ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ !

अमेरिकेने ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ची निर्मिती केल्यावर रशियाने त्यापेक्षा चारपट अधिक संहारक बॉम्बची निर्मिती करत त्याला ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ असे नाव दिले. वर्ष २००७ मध्ये रशियाने ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ बनवला. ‘रशियाज एव्हिएशन थर्मोबॅरिक बॉम्ब’ असे त्याचे अधिकृत नाव आहे. चाचणीच्या वेळी या भयंकर अस्त्राचा जो स्फोट झाला, त्याचा परिणाम एक सहस्र फुटाच्या परिसरावर झाला होता. त्याची क्षमता ४४ टन टीएन्टी स्फोटकांइतकी होती. या बॉम्बचा स्फोट हवेतच केला जातो. त्यामुळे आग भडकते आणि लक्ष्याची क्षणार्धात वाफ होऊन जाते. या अणूविरहित बॉम्बची तुलना अगदी अण्वस्त्राशीही करता येऊ शकते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *