मुंबई : आजच्या युवा पिढीचे अभ्यासाचे साधन ग्रंथ, कादंबर्या हे नसून फेसबूक, व्हॉट्स अॅप आणि यू ट्यूब झाले आहे. याच माध्यमातून ब्रिगेडी मंडळी संदर्भहीन, खोटारडा इतिहास पसरवून हिंदु समाजात जातीविषयक फूट पाडण्याचे षड्यंत्र रचत आहेत. रायगडावर पुण्यतिथीला ढोल वाजवणार्यांचीही चौकशी करायला हवी. हे कोणीतरी जाणीवपूर्वक केले आहे. यापुढे ब्रिगेडींनी हे चालू ठेवल्यास त्यांना शिवसूर्यजाळ दाखवण्यासाठी शिवप्रेमींनी सिद्ध रहावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. बळवंतराव दळवी यांनी केले. शिवतीर्थ (दादर) येथे शिवरायांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करण्यात आले. या वेळी ११५ हून अधिक धारकरी, शिवप्रेमी आणि राष्ट्राभिमानी उपस्थित होते. या वेळी श्री. दळवी बोलत होते.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनीही ‘छत्रपती शिवरायांचा खून-एक थोतांड’ या विषयावर ऐतिहासिक दाखले देत मार्गदर्शन केले.
क्षणचित्रे
१. या वेळी पूज्य भिडेगुरुजी रचित ध्येयमंत्राचे उच्चारण करण्यात आले.
२. छत्रपती शिवरायांचे देहावसान झाले, तेव्हा चैत्र पौर्णिमा होती. पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहून सर्व शिवभक्तांनी महाराजांच्या शेवटच्या क्षणाचा साक्ष असलेल्या चंद्राला वंदन केले.
३. हिंदु धर्म, हिंदु समाज आणि हिंदुस्थान यांच्या आंतर्बाह्य शत्रूंचे निर्दालन करणे अन् भारतमातेचे संरक्षण करणे यांची पवित्र शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात