डॉ. के.व्ही. सीतारामय्या यांच्या ‘द व्हेरी एक्झिस्टन्स ऑफ अवर हिंदु नेशन इज इन डेंजर’ या इंग्रजी पत्रांच्या पुस्तकाचे प्रकाशन
भाग्यनगर (आंध्रप्रदेश) : कोणताही राजकीय नेता भारताला हिंदु राष्ट्र बनवू शकत नाही. भारताचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मुसलमान, ख्रिस्ती, साम्यवादी, प्रसारमाध्यमे आणि काही राजकीय नेते स्वयंभू हिंदु राष्ट्र नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदूंनी सैनिक बनून धर्माच्या बाजूने लढले पाहिजे, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. मीही एक सैनिक असून यात सहभागी आहे. मी या जन्मात भारत हिंदु राष्ट्र होतांना नक्कीच पाहीन, हा माझा विश्वास आहे, असे प्रतिपादन नेताजी स्फूर्ती केंद्रम्चे संस्थापक डॉ. के.व्ही. सीतारामय्या यांनी केले.
येथील चिकाडपल्लीमधील ‘सिटी सेंट्रल लायब्ररी’ येथे ९ एप्रिल या दिवशी डॉ. सीतारामय्या यांच्या ‘द व्हेरी एक्झिस्टन्स ऑफ अवर हिंदु नेशन इज इन डेंजर (आपल्या हिंदु राष्ट्राचे अस्तित्व धोक्यात)’ इंग्रजी पत्रांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. अखिल भारत हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री श्री त्रिदंडी रामानुज जियार स्वामी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी माजी मंडल निरीक्षक श्री. जयचंद्र राजू आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन जनार्दन आदी उपस्थित होेते.
डॉ. के.व्ही. सीतारामय्या यांचे कार्य
नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पंतप्रधानपदाचा स्वीकार केला, त्या दिवशी अर्थात् २६ मे २०१४ या दिवशी डॉ. के.व्ही. सीतारामय्या यांनी मोदी यांना पहिले पत्र लिहिले. त्यासमवेत ‘श्रीराम कृष्ण : अवर हिरोज् ऑफ धर्मा अॅण्ड कर्मा’ आणि ‘भारतीय धर्म संस्थापना’ हे दोन ग्रंथही पाठवले. त्यानंतर २८ ऑगस्ट २०१४ या दिवशी ‘द ट्रु हिस्ट्री ऑफ एम्.के. गांधी’ हा ग्रंथ पाठवला, तसेच २ जून २०१५ या दिवशी तोच ग्रंथ ६४ केंद्रीय मंत्र्यांनाही पाठवला. ११ ऑक्टोबर २०१६ या दिवशी पुन्हा ‘द व्हेरी एक्सिटन्स ऑफ अवर हिंदु नेशन इज इन डेंजर’ हा ग्रंथही पाठवला. यातून डॉ. सीतारामय्या यांची भारताचे भवितव्य आणि हिंदू यांच्याविषयी वाटणारी आस्था लक्षात येते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात