-
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सामाजिक साहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे प्रकरण
-
भक्तांनी अर्पण केलेला निधी धार्मिक कार्यासाठीच वापरण्याची मागणी !
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने वर्ष २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात सामाजिक साहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. भाविकांनी दिलेला निधी धार्मिक कार्यासाठी न वापरता सामाजिक कार्यासाठी वापरणे म्हणजे मूळ उद्देशाला हरताळ फासण्यासारखेच आहे. तरी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने वर्ष २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात सामाजिक साहाय्यता निधीसाठी केलेली २ कोटी रुपयांची तरतूद रहित करून ती धार्मिक कार्यासाठीच वापरण्यात यावी, या मागणीसाठी रविवार, १६ एप्रिल या दिवशी सकाळी ११ वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष, संप्रदाय यांच्यासह १४० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. (भक्तांचा निधी धार्मिक कार्यासाठी वापरला जावा, यासाठी आंदोलन करणार्या श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
आंदोलनामध्ये मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार
१. डॉ. मानसिंग शिंदे, सनातन संस्था : हिंदूंची मंदिरे ही चैतन्याचे स्रोत आहेत. त्यातूनच खरी ऊर्जा मिळून समाजाची सात्त्विकता वाढते. आज श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये शौचालय, तसेच प्राथमिक सुविधाही उपलब्ध नाहीत. मंदिराच्या निधीचा उपयोग धर्मशिक्षण देण्यासाठीच झाला पाहिजे. तसे होत नसेल, तर मंदिरे भक्तांच्या कह्यात द्यावीत.
२. श्री. किरण कुलकर्णी, शिवसेना, कागल शहर प्रमुख : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीसारख्या समित्या मंदिरांच्या निधीवर लक्ष ठेवण्यासाठीच, पुरोगाम्यांच्या वापरासाठीच स्थापन झालेल्या आहेत. सामाजिक कार्य हिंदूंनीच करायचे आणि त्याचे लाभ केवळ इस्लाम अन् ख्रिस्ती धर्मियांनी घ्यायचे, असे आहे. कधी मशिदी आणि चर्च यांचा पैसा सामाजिक कार्यासाठी वापरलेला आपण पाहिला आहे का ? हिंदूंनी दान करायचे आणि इतरांनी घेऊन ते लुटायचे, ही परिस्थिती आता पालटायला हवी. ‘एक मराठा लाख मराठा’ याद्वारे मराठ्यांचे संघटन ही कौतुकास्पद गोष्ट आहे; पण एक मराठा (श्री. कुलभूषण जाधव) आज पाकिस्तानमध्ये अडकला असतांना सर्वांची तोंडे का बंद आहेत ?
३. श्री. संभाजी साळुंखे, जिल्हाध्यक्ष, बजरंग दल : हिंदु जनजागृती समितीने चालू केलेला हा उपक्रम अतिशय चांगला आहे. हिंदु जनजागृती समिती आज झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागृत करण्याचे कार्य करत आहे. मंदिराचा निधी हा मंदिरांची दुरुस्ती, सुशोभीकरण यांसाठी न वापरता सामाजिक कार्यासाठी देऊन हिंदूंना फसवले जात आहे. जर हिंदु धर्मावर कोणी उलटसुलट बोलून तोंडसुख घेत असेल, तर त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल.
४. श्री. महेश उरसाल, शहराध्यक्ष, बजरंग दल : गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार बाहेर आला आहे. असे असतांना देवस्थान समिती हिंदूंनी श्रद्धेपोटी अर्पण केलेले पैसे सामाजिक कार्यासाठी कसे वापरू शकते ? त्याला विरोध केलाच पाहिजे. आज मंदिराच्या ठिकाणी भाविकांसाठी सुसज्ज शौचालय नसणे, तसेच इतरही समस्या आहेत. सामाजिक कार्याचा एवढा कळवळा असेल, तर तुमच्या वेतनातून पैसे द्या. यापूर्वीही देवस्थान समितीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाला १५ लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. मंदिराला मिळणार्या निधीचा वापर पूजाअर्चा, होमहवन यांसारख्या धर्मांशी निगडित गोष्टींसाठीच व्हायला हवा.
५. श्री. संभाजी भोकरे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना : मंदिरात अर्पण केलेल्या पैशांवर अधिकार दाखवणार्या शासनकर्त्यांनाच हद्दपार केले पाहिजे. कागलमधील एक जागृत मंदिर दुरावस्थेत असून तेथे लहान मुलांना उभे रहाण्यासाठीही जागा नाही, पत्रे नाहीत, फरशी नाही, अशी अनेक मंदिरामध्ये स्थिती असतांनाही देवस्थान समितीचा सामाजिक कार्यासाठी निधी देण्याचा निर्णय अत्यंत अयोग्य आहे. याचा सर्व हिंदूंनी निषेध केला पाहिजे.
६. श्री. सुनील पाटील, जिल्हाध्यक्ष, पतित पावन संघटना : जिल्हाधिकारी हे देवस्थान समितीचे मालक नाहीत, तर ते विश्वस्त आहेत. देवस्थान समितीकडे असलेली ३ सहस्र ६७ मंदिरे अगोदर विकसित करा. केवळ जोतिबा मंदिर आणि श्री महालक्ष्मी मंदिर सोडून इतर मंदिरे लोकांना माहिती नाहीत. त्यामुळे उर्वरित मंदिरांच्या विकासासाठीही लक्ष देणे आवश्यक आहे.
७. श्री. संजय कुलकर्णी, उपाध्यक्ष, : या पूर्वीही झालेल्या आंदोलनांची नोंद घेऊन त्यावर विधानमंडळात आमदारांनी आवाज उठवला आणि त्यावर पुढील प्रक्रिया घडली, हे आंदोलनाचे यश आहे.
८. श्री. किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती : आज अनेक सामाजिक संस्थांमध्ये हिंदु बांधव सामाजिक कार्य करतच आहेत. त्यामुळे श्री महालक्ष्मी मंदिरात हिंदु बांधवांनी भक्तीभावाने अर्पण केलेल्या निधीचा वापर धार्मिक कार्यासाठी व्हावा. जर देवस्थान समितीने हा निर्णय रहित केला नाही, तर राज्यव्यापी आंदोलन केले जाईल.
उपस्थित मान्यवर : श्री. आकाश नवरूखे, पतित पावन संघटना; श्री. मनोहर सोरप, हिंदु महासभा शहराध्यक्ष; श्री. सुधाकर सुतार; श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती सदस्य श्री. एस्.बी. देवणे; भाजप शहरप्रमुख श्री. वडणगे; शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर; रेंदाळ येथील श्री. ओमराज माळवदे; सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे
आंदोलनाच्या वेळी देण्यात आलेल्या घोषणा
१. हिंदूंना एक न्याय आणि अन्य धर्मियांना एक न्याय चालणार नाही, चालणार नाही !
२. मंदिरांचे सरकारीकरण आणि अन्य प्रार्थनास्थळांना मोकळीक चालणार नाही, चालणार नाही !
विशेष !
१. भर उन्हात सर्व हिंदु धर्माभिमानी आंदोलनासाठी शेवटपर्यंत उपस्थित होते.
२. आंदोलनाचा विषय समजून घेऊन समाजातील काही हिंदु धर्माभिमानी उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी झाले होते.
३. या आंदोलनाचे ‘फेसबूक’द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात