पुणे : शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाचे दर्शन घेण्यात देवस्थानाने स्त्री-पुरुष असा कोणताही भेद केलेला नाही. सर्वांना ठराविक अंतरावरून दर्शन घेण्याची सुविधा असतांना थेट शनिदेवाच्या चौथर्यावर चढून धार्मिक प्रथा मोडण्याचा अट्टाहास करणार्या काही अहंकारी आणि प्रसिद्धीलोलूप महिलांना रोखले गेले. हे देवस्थान मंडळ, शनिशिंगणापूर ग्रामस्थ आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या संघशक्तीचे यश आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासन आणि पोलीस यंत्रणा यांनी घेतलेल्या न्याय्य भूमिकेचे आम्ही स्वागत करतो; मात्र हा धोका अद्याप पूर्णतः टळलेला नाही. यापुढे अशा प्रकारे अनुचित आणि धार्मिक प्रथांना गालबोट लावणारे प्रकार शनिशिंगणापूर, तसेच अन्य धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी होऊ नयेत; म्हणून शासन यंत्रणेने कायमस्वरूपी सतर्क राहून उपाययोजना काढावी, अशी आमची मागणी आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की, शनिशिंगणापूर येथे महिलांना समान अधिकार नाकारून संविधानाचा अवमान होत असल्याचा कांगावा भूमाता ब्रिगेड आणि तथाकथित पुरोगामी करत आहेत. याच संविधानाने प्रत्येकाला धार्मिक प्रथा-परंपरा यांचे पालन आणि रक्षण करण्याचा अधिकार दिला आहे, याचा पुरोगाम्यांना सोयीस्कररित्या विसर का पडतो ? शनिशिंगणापूरच्या ग्रामसभेने आणि तेथील महिलांच्याही ग्रामसभेने शनिशिंगणापूरची धार्मिक प्रथा-परंपरा मोडायची नाही; म्हणून पोलिसांसमोर एकमताने ठराव संमत केला. ग्रामसभांना अधिकाधिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे शासकीय पातळीवरचे धोरण असतांना त्यालाच थेट आव्हान देऊन कायदाद्रोह करण्याचा प्रकार भूमाता ब्रिगेड आणि तथाकथित पुरोगामी करत आहेत. नाहक वाद निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणणार्या भूमाता ब्रिगेडवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात