पोलीस दलाला काळीमा फासणारा प्रकार !
सांगली/कोल्हापूर : वारणानगर येथील शिक्षक वसाहतीमधील बंद सदनिकेतील सुमारे सवानऊ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात सांगलीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, साहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशीवे, साहाय्यक फौजदार शरद कुरळपकर, पोलीस हवालदार शंकर पाटील, रवींद्र पाटील, पोलीस नाईक दीपक पाटील, कुलदीप कांबळे यांच्यासह मोहिद्दीन मुल्ला आणि प्रवीण सावंत यांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हे प्रविष्ट झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वारणानगर येथील शिक्षक वसाहतीमधील इमारत क्रमांक ५ मध्ये बांधकाम व्यावसायिक झुंजार माधवराव सरनोबत यांची सदनिका आहे. या सदनिकेतून १२ मार्च २०१६ या दिवशी मोहिद्दीन अबुबकर मुल्ला याने सुमारे साडेतीन कोटी रुपयांची चोरी केली. या संदर्भात सरनोबत यांनी कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद प्रविष्ट केली होती. पोलिसांनी मोहिद्दीन मुल्ला याला अटक करून चोरीतील ३ कोटी ७ लक्ष रुपये जप्त केले. चौकशीच्या वेळी मोहिद्दीन याला परत वारणानगर येथील संबंधित सदनिकेत नेले. या वेळी पोलिसांना पुन्हा सुमारे दीड कोटी रुपयांची रक्कम मिळाली. या प्रकरणी शिक्षण संस्थेतील पदाधिकार्यांसह अनेकांनी चौकशी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली होती.
वारणानगर येथील सदनिकेत कोट्यवधी रुपयांची रक्कम होती याचा तपास सर्वांगाने व्हावा, याची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी तक्रार शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने नांगरे-पाटील यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.
या प्रकरणाचा साडेतीन महिने तपास करण्यात आला. त्यात झुंझार सरनोबत यांच्या मालकीच्या सदनिकेतून १३ मार्च २०१६ या दिवशी ६ कोटी रुपयांची रक्कम, तर १५ मार्च २०१६ या दिवशी ३ कोटी १८ लक्ष रुपये अशी ९ कोटी १८ लक्ष रुपयांची रक्कम संगनमताने आणि अधिकाराचे अपलाभ घेत दोन पोलीस अधिकारी आणि पाच पोलीस कर्मचार्यांनीच घेतल्याचे पुढे आले. या प्रकरणी झुंजार सरनोबत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १६ एप्रिल कोडोली पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे प्रविष्ट झाले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात